नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) देणगी दान चोरीवरुन एक अत्यंत खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. राम मंदिर ट्रस्टचे (Ram Mandir Trust) माजी लेखा प्रभारी (अकाउंटंट) महिपाल सिंह यांनी मंदिराच्या बांधकामावर ८०० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाऐवजी तब्बल २२०० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर ट्रस्टचे तत्कालीन सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्यावर जाहीर आरोप करत विशेष तपास पथकाकडे आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे सादर केले असून काही नवीन खुलासे देखील केले आहे.
महिपाल सिंह यांनी याआधी ९ जून रोजी काही गंभीर आरोप केले होते, ज्यावरून आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. लखनऊचे कमिश्नर आणि एसआयटीचे अध्यक्ष विजय विश्वास पंत यांनी ई-मेल पाठवून महिपाल सिंह यांना त्यांच्या आरोपांशी संबंधित पुरावे सादर करण्याची संधी दिली होती. त्यानुसार त्यांनी एसआयटीला पुरावे सुपूर्द केले आहेत.
महिपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्येच त्यांनी मंदिरातील देणगीच्या रकमेत होणारी चोरी पकडली होती. रामशंकर यादव यांच्या सांगण्यावरुन बँकेचे कर्मचारी रत्नेश चतुर्वेदी आणि गगनदीप हे कॅश मोजताना नोटांचे अतिरिक्त बंडल चोरून न्यायचे. ही बाब चंपत राय यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी “शांत राहा” असा सल्ला दिला आणि दुसऱ्याच दिवशी डॉ. अनिल मिश्रा यांनी महिपाल सिंह यांची हकालपट्टी करून सुभाष श्रीवास्तव यांची नियुक्ती केली. विशेष म्हणजे, हाच सुभाष श्रीवास्तव सध्या पोलिसांच्या अटकेत आहे.
मंदिर निर्माणाच्या देखरेखीसाठी ज्यांना प्रकल्प अधिकारी बनवण्यात आले, त्यांना सिव्हिल इंजिनिअरिंगचा अनुभव नव्हता, असा दावाही करण्यात आला आहे. यामुळे मंदिराचे बांधकाम वास्तुशास्त्रानुसार झाले नाही आणि विनाशुल्क मिळणारे दगड न घेता निकृष्ट दर्जाचे दगड खरेदी करण्यात आले.
मोफत उपलब्ध असणारे प्रसिद्ध ‘बंशी पहाडपूर’चे दगड न वापरता ट्रस्टने निकृष्ट दर्जाचे दगड विकत घेतले. विनामूल्य जागा मिळत असतानाही एका महांताला खूश करण्यासाठी ट्रस्टचे कार्यालय महांत शशिकांत दास यांच्या राम कचेरी मंदिरात सुरू करण्यात आले. याशिवाय अनेक वादग्रस्त जमिनी खरेदी केल्या गेल्या, ज्यांचा ताबा ट्रस्टला मिळालाच नाही आणि कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये कोट्यवधी रुपये वाया गेले. माजी कॅशियर वीरेंद्र वर्मा यांनी काम न केलेल्या व्यक्तींच्या नावे परस्पर पैसे लाटल्याचेही पुराव्यांत नमूद आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आता पोलीस आणि एसआयटीने कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दानपेटी चोरी प्रकरणातील काही संशयित आधीच पोलिसांच्या ताब्यात असून, माजी लेखापालांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे एसआयटी आता आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणामुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, ट्रस्टच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




