अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी-1 नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी याबाबत जिल्हास्तरीय यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. या चाचणीत प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक कितपत साध्य केली आहे, याची पडताळणी करणे हा चाचणीचा प्रमुख उद्देश आहे.
त्याआधारे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी शिक्षकांना मदत होणार आहे. संकलित मूल्यमापन चाचणी ही इयत्ता दहावी किंवा बारावीच्या बोर्ड परीक्षेप्रमाणे नसल्याने विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण देऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील उणिवा शोधून त्यावर कृती कार्यक्रम राबविणे, तसेच अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणा घडवून आणणे, हा या चाचणीचा मुख्य हेतू आहे.
दुसरी ते आठवीपर्यंत गुणांची रचना
प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी या तिन्ही विषयांची चाचणी सर्व माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येईल. इयत्ता दुसरीसाठी लेखी व तोंडी परीक्षेसाठी 30 गुण, तिसरी-चौथीसाठी 40 गुण, पाचवी-सहावीसाठी 50 गुण आणि सातवी-आठवीसाठी 60 गुण असतील. इयत्तेनुसार परीक्षेचा कालावधी 60 ते 120 मिनिटांचा राहणार आहे. शाळांना त्यांच्या सकाळ किंवा दुपारच्या सत्रानुसार वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र तोंडी परीक्षा संबंधित दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्याच्या सूचना आहेत. विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यास उपलब्ध वेळेनुसार ती पुढील दिवशी घेता येणार आहे.
प्रश्नपत्रिकांची गोपनीयता काटेकोर
चाचणीच्या प्रश्नपत्रिका अंदाजे 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत वितरित करण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्यानंतर त्या सुरक्षित व स्वतंत्र खोलीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकार्यांवर राहणार आहे. प्रश्नपत्रिकांचे फोटो काढणे किंवा समाजमाध्यमांवर प्रसारित करणे यासारखे गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गुणांवरून शिक्षकांवर कारवाई नाही
विशेष म्हणजे, या चाचणीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे कोणत्याही शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नसल्याचे शासनाच्या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. चाचणीचे गुण विद्यार्थ्यांच्या अध्ययनविषयक गरजा ओळखून प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.




