बाभळेश्वर |वार्ताहर| Babhleshwar
प्रवास करायचा म्हटलं की सर्वप्रथम पसंती देतात प्रवासी ते राहाता तालुक्यातील बाभळेश्वर बसस्थानकाला. याचे कारण म्हणजे बाभळेश्वर बसस्थानक हे चौफुलीचे गाव असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात बस येतात आणि प्रवाशांना बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळते. शिवाय या ठिकाणाहून महाराष्ट्रात कोठेही जाण्यासाठी बस मिळते. परंतु काही महिन्यांपासून या बाभळेश्वर बसस्थानकात स्त्रियांच्या गळ्यातील सोने चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारने महिलांना प्रवासामध्ये निम्मी सवलत दिल्यामुळे तसेच 75 वर्षे वयावरील नागरिकांना मोफत प्रवास मिळाल्यामुळे महिला वर्गाचे प्रवास करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रात देवदर्शनासाठी जाताना या ठिकाणी बस मिळते, त्यामुळे येथे महिला मोठ्या प्रमाणावर बसने प्रवास करतात. याचाच फायदा आता सोने चोरणार्यांनी उठविला आहे. अलीकडच्या काळात तर या ठिकाणी जणू हे बाभळेश्वर बसस्थानक चोरीचे केंद्र बनले आहे, असे वाटायला लागले आहे. येथे मोठ्या प्रमाणात महिलांचे सोने चोरीला गेले आहे.
परंतु कायद्याच्या किचकट प्रक्रियेमुळे महिला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात. कारण सोनं चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी सोन्याची पावती येथे मागितली जाते. ती शक्यतो उपलब्ध नसल्यामुळे महिला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात. याच संधीचा फायदा चोरांनी उठविला आहे. या सर्व कारणांमुळे बाभळेश्वर बसस्थानकातून प्रवास करताना प्रवासी टाळाटाळ करत आहेत. सोने चोरीचे गुन्हे दाखल होत नसल्यामुळे नेमके किती सोनं या ठिकाणाहून गेले हे कळत नाही. परंतु चोरी झालेली राहते हे गावाला मात्र कळते. प्रत्यक्षात पोलीस स्टेशनला याची नोंद नसते.
बाभळेश्वर बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत बाभळेश्वर पोलीस दूरक्षेत्र आहे. परंतु या ठिकाणी कायमच दरवाजाला कुलूप असते. नेमकं ड्युटीवर असणारे पोलीस कुठे असतात हेच कळत नाही. त्यामुळे बसस्थानकात सोन्याची चोरी झाली तरी तक्रार कुठे करावी हेच कळत नाही. रात्रीच्या वेळेस तर बाभळेश्वर बस स्थानकाचे चित्रच वेगळे असते.
रात्री बर्याच वेळा बसस्थानकात बस जात नाही. त्यामुळे बसस्थानकाचा उपयोग मद्यपी दारू पिण्यासाठी तसेच गांजा पिण्यासाठी करतात. नगर-मनमाड महामार्गावरील बाभळेश्वर चौकात कायम गर्दी असते. बर्याच वेळा या चौकात वाहतुकीचा खोळंबाही होतो. त्यामुळे चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. तसेच बाभळेश्वर पोलीस दूरक्षेत्र हे 24 तास चालू असावे, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
बाभळेश्वर बसस्थानकाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे या ठिकाणी कोणतीही सीसीटीव्ही कॅमेरेची सोय करण्यात आलेली नाही. तसेच सर्वत्र लाईटची सोय नसल्यामुळे याचाच फायदा सोने अथवा इतर चोरी करणार्यांना होतो. तसेच रात्रीच्या मद्यपी व गर्दुल्ले यांचा त्रास असल्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.




