बदलापूर | Badlapur
बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या आदेशानंतर वरिष्ठांकडे त्यांनी आपला राजीनामा दिला. शाळेची बदनामी होऊ नये आणि भाजपला त्रास होऊ नये यासाठी मी राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया त्याने माध्यमांना दिली.
विशेष म्हणजे, कालच कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारणी बैठकीत आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर, समाजातून तीव्र प्रतिक्रिया येत होत्या, तर भाजपने तुषार आपटे याच्या स्वीकृत नगरसेवकपदाचा तातडीने राजीनामा घेतला नाही तर येत्या १३ किंवा १४ जानेवारीला मनसे बदलापूरमध्ये मोर्चा काढेल आणि आंदोलन करेल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता. वाढता विरोध लक्षात घेत तुषार आपटेंनी आपला राजीनामा दिला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना तुषार आपटे म्हणाला की, “मी स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देत आहे. शाळेला, आदर्श विद्यामंदिर संस्थेला आणि भाजप पक्षाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मी हा राजीनामा स्वतःहून देत आहे.” अशी प्रीतीक्रिया त्याने दिली. ४ नगरसेवक निवडणून आणल्याबद्दल भाजपने त्याला स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले होते, याबाबत विचारले असता त्याने त्यावर बोलणे टाळले. शाळेची आणि भाजपची कोणत्याही प्रकारची बदनामी होऊ नये, यासाठी मी राजीनामा देत असल्याचा पुरुच्चार त्याने केला.
राजीनाम्यात काय म्हंटले?
महोदय, मी विनंतीपूर्वक अर्ज करतो की, माझी कुळगाव बदलापूर नगरपरिषद स्वीकृत सदस्य / नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मी आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी या पदाचा स्वखुशीने राजीनामा देत आहे, माझा राजीनामा स्वीकारावा ही विनंती, असा आशय तुषार आपटेनी राजीनामापत्रात दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हंटले होते?
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक केलं, याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्याच्यावर योग्य कारवाई होईल. ज्यांनी ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होत असते. निष्पक्षपणे कारवाई होईल चिंता करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्र्यांनी दिली. त्यानंतर, काही वेळातच तुषार आपटेचा राजीनामा घेण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूर येथील एका प्रतिष्ठीत शाळेत दोन लहान मुलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणी कंत्राटी सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. यानंतर शाळा प्रशासनातील आणि व्यवस्थापन समितीमधील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचवेळी तुषार आपटे याला सहआरोपी करण्यात आले. पण, या व्यक्तीला भाजपने बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक नियुक्त केले आहे. या नियुक्तीवर राज्यभरातून रोष आणि नाराजी व्यक्त होत करण्यात आली.




