मुंबई | Mumbai
देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये (Badlapur) अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (School Sexual Assault Case)
या दुर्देवी घटनेनंतर आज (दि. २० ऑगस्ट) सकाळपासून हजारो बदलापूरकर नागरिक (Citizen) रस्त्यावर उतरले आहेत. तसेच पालकांनी या शाळेबाहेर आंदोलन देखील सुरू केले. तर काही नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूक रोखून धरत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. याप्रकरणात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक प्रमाणे चालवला जाईल, असं सांगितलं.
हे देखील वाचा : धक्कादायक! अल्पवयीन मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार; संतप्त पालक रस्त्यावर उतरले
दीपक केसरकर म्हणाले, कॅार्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर सर्व शाळांमध्येही विशाखा समिती स्थापन होणार आहे. यात नववी-दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी असतील, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसेच या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करावे, अशी मागणीही आपण गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचंही केसरकर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील शाळेत सीसीटीव्ही चालू अवस्थेत नसल्याचे आढळले आहे. त्यावरही कारवाई होईल, असेही केसरकर म्हणाले.
हे देखील वाचा : कोलकाता अत्याचार प्रकरण! डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय, ममता सरकारलाही फटकारलं
केसरकर पुढे म्हणाले, सखी सावित्री समिती प्रत्येक शाळेत स्थापन झाली, तर मुलींना दिलासा मिळू शकतो. पोक्सो कायद्याप्रमाणे ई-बॉक्स नावाची संकल्पना आहे. परंतु ग्रामिण भागात लहान मुलांना ही संकल्पना समजू शकत नाही. आम्ही ज्यावेळी गृहराज्याचा राज्यमंत्री होतो, त्यावेळी एक जीआर काढला होता. प्रत्येक शाळा, हॉस्टेल, आश्रमात तक्रार बॉक्स ठेवला पाहिजे. शाळेचा मुख्याध्यावर आण पोलीस प्रतिनिधी यांनी त्या बॉक्समध्ये असलेली तक्रार वाचली पाहिजे. त्या प्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आम्ही नवीन जीआर काढत आहोत.