Thursday, May 2, 2024
Homeनगरजनतेच्या प्रतिसादाशिवाय करोनावर मात करता येणार नाही

जनतेच्या प्रतिसादाशिवाय करोनावर मात करता येणार नाही

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

जनतेच्या प्रतिसादाशिवाय कोव्हिडवर मात करणे शक्य नाही, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पाथर्डी तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत म्हणाले. विरोधी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करून प्रशासनातील त्रुटींचा पंचनामा केला. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीपासून दूर राहणे पसंत केले. कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना मुक्त संचार असलेल्या बैठकीत पत्रकारांना मज्जाव होता.

- Advertisement -

शहरातील शेवगाव रोडवरील अर्जुना लॉन्स येथे महसूलमंत्री थोरात यांच्या उपस्थितीत पाथर्डी तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांना निमंत्रित करण्यात आले. मात्र क्वारंटाईन असल्याने त्या बैठकीस गैरहजर होत्या.

व्यासपीठावर आ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधीर पोखरणा, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक कराळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, गटविकास अधिकारी शितल खिंडे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, काँग्रेसचे प्रवक्ते दादासाहेब मुंडे आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष सरपंच अविनाश पालवे, भाजपाचे पंचायत समिती सभापती गोकुळ दौंड, पं. स. सदस्य विष्णूपंत अकोलकर, सुभाष केकाण, मुकुंद गर्जे, संदीप पठाडे आदींनी स्थानिक प्रशासनातील कच्चे दुवे मंत्र्यांपुढे उघड केले.ना. थोरात यांनी समन्वय साधत अधिकार्‍यांना सावरले. लसीचा तुटवडा, लस केंद्रावरील गोंधळ, अपुरा कर्मचारी वर्ग, उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय, कोव्हिड केअर सेंटरच्या अडचणी, अँटीजेन किटचा तुटवडा, व्हेंटिलेटर मशीन तज्ञ यांची नियुक्ती आदी मुद्यांवरून कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

खाजगी डॉक्टरांकडून कोव्हिड उपचाराच्या नावाखाली रुग्णांची होणारी लूट याकडे सुभाष केकाण यांनी लक्ष वेधले असता डिस्चार्ज देताना रुग्णांजवळ पैसे नसतील तर रुग्णांना अडवून ठेवता येणार नाही. बील भरायचे राहिले तरी डॉक्टरांनी रुग्णांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला पाहिजे. बिलाचे ऑडिट करण्यासंबंधी मंत्र्यांनी गटविकास अधिकार्‍यांना आदेश दिले.अधिकार्‍यांनी स्वतःचे फोन सतत चालू ठेवून येणारा प्रत्येक कॉल स्विकारला पाहिजे, अशा सूचना दिल्या. तालुकास्तरीय कोव्हिड संबंधित हेल्पलाईन सुरू करावी.तातडीची सेवा व माहिती केंद्र हेल्पलाईन नंबर पुन्हा सुरू करून स्थानिक प्रशासनाने यंत्रणा व रुग्णांमध्ये समन्वय साधावा.

भाजपाच्या पदाधिकार्‍यांनाही ना. थोरात यांनी प्रश्न विचारण्याची संधी दिली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र बैठक सुरू होण्यापुर्वीच निवेदन देऊन निघून गेले. शिवसेनेचे पदाधिकारी बैठकीकडे फिरकलेच नाहीत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. भाषणा दरम्यान मंत्री थोरात यांनी जिल्हाधिकारी, डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कामाचे व नियोजनाचे कौतुक करत अधिकार्‍यांना सहकार्य करा, त्यांच्याकडून कामे करून घ्या. सुविधा बाबतीत शासन प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.पाथर्डी तालुक्यातील कमी होणारी रुग्ण संख्या दिलासादायक वाटत असली तरी आगामी काळात तपासणी संख्या वाढवण्यावर भर देणार असल्याचे ना. थोरात यांनी सांगितले. नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या