Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबंडूकाका बच्छाव यांचा समर्थकांसह भाजप प्रवेश निश्चित

बंडूकाका बच्छाव यांचा समर्थकांसह भाजप प्रवेश निश्चित

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगावला होणार पक्षप्रवेश सोहळा

- Advertisement -

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

महानगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यश संपादनासह पक्ष संघटन मजबुतीसाठी जिल्ह्यात भाजपतर्फे सुरू करण्यात आलेल्या तोडफोड-पक्षांतराच्या अभियानाचे लोण मालेगावी येवून धडकले आहे. येथील बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक व बाजार समिती माजी सभापती बंडू काका बच्छाव हे शहर व तालुक्यातील आपल्या हजारो समर्थकांसह येत्या २८ नोव्हेंबररोजी भाजपात प्रवेश करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, संघटनमंत्री विजय चौधरी आदी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असल्याचे निश्चित झाल्याने शहरासह तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत महायुती होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजप या पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची असलेली मांदियाळी पाहता अशक्य आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे करण्याच्या दृष्टीकोनातून भाजपतर्फे पक्ष संघटन मजबुतीसह विजयाचे समीकरण जुळविण्याच्या हेतूने ज्येष्ठ नेते प्रसाद हिरेंपाठोपाठ शहरासह तालुक्यात प्रभाव ठेवून असलेल्या तसेच विधानसभा निवडणुकीत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करणार्‍या बंडुकाका बच्छाव यांना भाजपने गळाला लावले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीत बच्छाव यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. उबाठा सेना उपनेते अव्दय हिरे हे देखील रिंगणात असल्याने तिरंगी लढत रंगली होती. यामुळे निकालाची उत्सुकता येथे निर्माण झाली होती. विकासकामांबरोबर लाडक्या बहिणींनी साथ दिल्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नेत्रदीपक विजय संपादन केला मात्र बच्छाव यांनी दुसर्‍या क्रमांकाची मते घेत आपले वर्चस्व दाखवून दिले होते. अव्दय हिरे हे तिसर्‍या क्रमांकावर फेकले जावून त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गतवेळेस झालेल्या निवडणुकीत भाजपात असलेल्या अव्दय हिरे यांनी जनसंपर्काच्या जोरावर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच जागा व पंचायत समितीत सहा जिंकत पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित केले होते. मंत्री भुसे यांच्या शिवसेनेला जिल्हा परिषदेत अवघ्या दोन जागेवर तर पंचायत समितीत सहा जागेवर समाधान मानावे लागले होते. मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेकडे असल्याने निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अव्दय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उबाठा सेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यांचे हे पक्षांतर अंगलट आल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले होते.

तालुक्यात पक्ष संघटन वाढावे यासाठी लोकसभा निवडणुक दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना तर काही महिन्यांपुर्वी काँग्रेस ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे यांना भाजपने पक्षात सामील करून घेतले होते. इच्छुकांच्या गर्दीमुळे महायुतीची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद-पंचायत समितीसह महानगरपालिकेच्या निवडणुकीत संघटन वाढीसह विजयाचे समीकरण जुळविण्याच्या दृष्टीकोनातून तसेच शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे राहू शकेल या दृष्टीकोनातून गत काही महिन्यापुर्वी भाजपात येण्याचे निमंत्रण बच्छाव यांना वरिष्ठ पातळीवरील नेत्यांतर्फे देण्यात आले होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, संघटनमंत्री विजय चौधरी आदी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर बच्छाव यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत येत्या २८ नोव्हेंबररोजी सटाणारोडवरील यशश्री कंपाऊंडमध्ये सायंकाळी बच्छाव आपल्या शहर व तालुक्यातील हजारो समर्थकांसह भाजपात दाखल होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर आज बच्छाव यांनी भाजप महानगरप्रमुख देवा पाटील यांच्या पक्ष कार्यालयास भेट देत शहरासह तालुक्यातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसमवेत झालेल्या पक्षप्रवेश चर्चेची माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. निलेश कचवे, प्रांतिक सदस्य व निवडणूक प्रमुख दादा जाधव, महानगरप्रमुख देवा पाटील, भरत पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, नंदूतात्या सोयगावकर, भाग्येश वैद्य, कमलेश निकम, शाम गांगुर्डे, मिलींद भालेराव, पोपट लोंढे, राजेंद्र जहाँगिरदार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण आपणांस मिळाले होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, संघटनमंत्री विजय चौधरी आदींसह वरिष्ठ नेत्यांनी देखील पक्षात प्रवेशाचा लवकर निर्णय घेण्याचे सुचित केले होते. त्यामुळे आपण शहर व तालुक्यातील आपल्या समर्थकांसह येत्या२८ नोव्हेंबररोजी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहोत. विधानसभा निवडणूक काळात आपल्याबरोबर ज्येष्ठ नेते सुनिल गायकवाड हे होते. त्यामुळे आपल्याबरोबर ते देखील पक्षात सक्रिय होणार असून वरिष्ठ नेत्यांनी त्यास मान्यता दिली आहे.
बंडूकाका बच्छाव, संस्थापक, बारा बलुतेदार मित्रमंडळ

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आज निकाल; पालकांना दाखवाव्या लागणार उत्तरपत्रिका

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी असणार आहे. त्यापूर्वी आज 1 मे रोजी इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा निकाल...