पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच अडचणीत असलेल्या पाथर्डी तालुक्यात शेतकर्यांसमोर आता सौरपंप व विद्युत मोटारींच्या केबल चोरीचे नवे संकट उभे राहिले आहे. तोंडुळी येथे 14 सौरपंपांच्या केबलसह एका विद्युत मोटारीची केबल, तर औरंगपूर शिवारात एकाच रात्री 10 शेतकर्यांच्या मोटारींच्या केबल चोरीला गेल्याचे उघडकीस आले. दोन्ही घटनांत सुमारे 43 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे.
तोंडुळी येथील सिद्धेश्वर सदाशिव वारंगुळे यांनी सोमवारी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या शेतातील 3 अश्वशक्तीच्या सौरपंपाची केबल 27 सप्टेंबरच्या रात्री चोरीला गेली. दुसर्या दिवशी मोटार सुरू न झाल्याने पाहणी केली असता केबल गायब असल्याचे आढळले. परिसरात चौकशी केली असता सदाशिव वारंगुळे, दत्तात्रय वारुळे, अंबादास वारुळे, सोमनाथ देशमुख, अर्चना भराट, संदिप नवले, अंकुश दरेकर, ममताजी दरेकर, बाळासाहेब दरेकर, किरण दरेकर, कविता कराळे, सूर्यभान दरेकर, विठ्ठल भराट आणि रामा दरेकर यांच्या सौरपंपांच्या केबल चोरीला गेल्याचे समोर आले. याशिवाय एका शेतकर्याची 3 अश्वशक्तीची विद्युत मोटार व 40 फूट केबलही चोरीला गेली.
दरम्यान, औरंगपूर शिवारातही जयदेव उत्तम किलबिले यांच्यासह 10 शेतकर्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या केबल चोरीला गेल्या. यामध्ये जयदेव किलबिले यांची 30 मीटर, विकास काकडे 31 मीटर, अशोक शिंदे 30 मीटर, बप्पासाहेब काकडे 30 मीटर, पंडित किलबिले 30 मीटर, भाऊसाहेब कासुळे 26 मीटर, सतीश शिंदे 30 मीटर, बाळासाहेब कासुळे 30 मीटर, गोविंद किलबिले 25 मीटर आणि संदीप देशमुख 25 मीटर केबलचा समावेश आहे. या घटनेत 14 हजार 350 रुपयांचे केबल चोरीला गेले असून किलबिले यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केबलमधील तांब्याला भंगार बाजारात चांगला भाव मिळत असल्याने चोरट्यांकडून शेतातील मोटारी व केबल लक्ष्य केल्या जात असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
विहिरी, बोअरवेल व पंपांची ठिकाणे रात्रीच्या वेळी निर्मनुष्य असल्याने चोरी करणे सोपे जाते. गेल्या दोन दिवसांपूर्वीही तालुक्यातील 10 ते 12 शेतकर्यांच्या केबल चोरीला गेल्या होत्या. त्यापूर्वी येळी, कासार पिंपळगाव व हनुमान टाकळी परिसरातही अशा घटना घडल्या आहेत. मागील महिन्यात आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील शेतातूनही केबल चोरीला गेली होती. दुष्काळात पिकांना पाणी देण्यासाठी सौरपंप व विद्युत मोटारींचा आधार असताना त्यांची चोरी होत असल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे. वारंवार तक्रारी करूनही चोरीचे सत्र सुरूच असल्याने शेतकर्यांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. चोरीच्या घटनांचा सखोल तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि शेतकर्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.




