Friday, May 29, 2026
Homeराजकीय"बारामतीत आपले मोठे मन दाखवावे, सुनेत्रा पवार…"; चंद्रशेखर बावनकुळे यांचे काँग्रेसला आवाहन

“बारामतीत आपले मोठे मन दाखवावे, सुनेत्रा पवार…”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे काँग्रेसला आवाहन

मुंबई । Mumbai

- Advertisement -

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी अखेर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, या मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होणार आहे. अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर आता त्यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये राजकीय वातावरण तापले असले, तरी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा सूर सर्वच राजकीय पक्षांतून उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वप्रथम ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली होती. त्यांचेच पाऊल पुढे टाकत आता महायुती सरकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काँग्रेस नेत्यांना मोठे मन करून बिनविरोध निवडीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अजित पवार यांचे सर्वांशी, विशेषतः काँग्रेस नेत्यांशी असलेले जुने ऋणानुबंध लक्षात घेता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केली.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील ७५ टक्के काळ काँग्रेससोबत काम केले आहे. त्यामुळे काँग्रेसने ही जागा प्रतिष्ठेची न करता सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी पुढाकार घ्यावा. केवळ काँग्रेसच नव्हे, तर ‘रासप’ आणि ‘वंचित’च्या नेत्यांनाही त्यांनी या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, काँग्रेसने बारामतीसोबतच राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकही लढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी बावनकुळे यांनी राहुरीत उमेदवार देणे हा काँग्रेसचा अधिकार असल्याचे सांगत बारामतीसाठी मात्र विशेष विनंती केली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या, परंतु नियमानुसार उपमुख्यमंत्रीपद भूषवताना सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व घेणे बंधनकारक आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवार आता बारामतीच्या रणांगणात उतरल्या आहेत. येत्या ६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

निवडणुकीची घोषणा होताच बारामती शहर आणि तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी महायुतीच्या वतीने रणनीती आखली जात असून, गावपातळीवर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाने आधीच ही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आणि महायुतीकडून बिनविरोध निवडीचे प्रयत्न सुरू असल्यामुळे, ४ मे रोजी लागणारा निकाल हा औपचारिकता ठरणार की चुरस पाहायला मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : एसआयआर मोहिमेची पूर्व तयारी सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मतदार याद्या अचूक आणि बीएलओंकडून गृहभेटी पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून एसआयआर मोहीम राबवली जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून बारा विधानसभा मतदारसंघांत...