बारामती | Baramati
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. आज बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे शरद पवार यांची प्रचार सभा झाली. या सभेदरम्यान त्यांनी अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी अजितदादांविषयी केलेल्या एका वक्त्व्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘३० वर्षे अजित पवारांनी कामं केली. माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही.’, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. तसेच यावेळी त्यांनी युगेंद्रला उमेदवारी का दिली यामागचे कारण देखील सांगितले आहे.
तुम्ही ४ वेळा मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं, २५ वर्ष मी बारामती मध्ये काम केले. पुढची सत्ता अजित दादांच्या हातात दिली आणि निर्णय तुम्ही घ्यायचे सांगितले. ३० वर्ष अजित पवारांनी कामे केले, माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही, असे मोठे वक्तव्य शरद पवार यांनी केले. पुढची तयारी करायची असेल तर नेतृत्व तयार करावे लागेल.नवीन नेतृत्व तयार करायचे आहे म्हणून युगेंद्रची उमेदवारी दिली. मी मत मागायला आलो नाही, तुम्ही मला मते द्यायला कधी काट कसर केली नाही. माझी निवडणूक असो, अजित दादा ची निवडणूक असो, सुप्रियाची असो तुम्ही कधी नाही म्हणाला नाहीत. लोकसभा कौटुंबिक राजकारणाची होती तरी तुम्ही सुप्रियाला मतदान केले, असे ते म्हणाले.
शरद पवार यांनी सभेदरम्यान सांगितले की, ‘तुम्ही मला जेव्हा निवडून दिलं तेव्हा मी विधानसभेत गेल्यावर एखादी योजना इथे करता येईल का? असा विचार केला होता. एका योजनेतून या भागात काहीसे पाणी यायला लागलं. दूध संघाची सुरुवात आम्ही केली ते नंतर १ लाख लिटरवर गेले. आम्ही हे दूध पुण्यात पोहचवले. डायनॅमिक कंपनी बारामतीमध्ये आली. तिथे ८ लाख दूध येते आणि त्यावर प्रक्रिया होते. शेती संकटात असेल तर दुसरा जोड धंदा पाहिजे.’
तसेच, ‘१८ तारखेला शेवटची सभा बारामतीमध्ये घ्यायला येईल. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि माझी उद्या मुंबईत सभा होणार आहे. त्यानंतर मी नागपुरमध्ये जाईल आणि तिथून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि शेवटी बारामतीमध्ये येईल. राज्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. सगळीकडे येणं शक्य नाही. जेवढं जायला लागेल तिकडे जाईल. निवडणुकीचे काम हातात घ्या आणि सांभाळा.’, असे आवाहन त्यांनी बारामतीकरांना केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा