श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
पती-पत्नीमधील वादातून सहा जणांनी केलेल्या मारहाणीमुळे पतीचा मृत्यू झाल्याची घटना उक्कडगाव येथे घडली. प्रभाकर अरुण तुपेरे (वय 36, रा. उक्कडगाव, ता. श्रीगोंदे) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कुंडलिक तुपेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेश्मा तुपेरे, छाया जानराव, देविदास आडबल्ले, नंदा आडबल्ले, रेखा बाळू साळवे, साधना संतोष गायकवाड या सहा जणांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रभाकर तुपेरे व त्याची पत्नी रेश्मा या दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. ती भांडणे प्रभाकरच्या आई-वडिलांनी मिटवली होती. शनिवारी (ता.28) रात्री प्रभाकर, पत्नी रेश्मा व सासू छाया जानराव हे तिघे घरात जेवण करीत होते. त्यावेळी जेवण वाढण्याच्या किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले.
भांडण चालू असताना प्रभाकरची सासू छाया जानराव हिने मानलेला भाऊ देविदास आडबल्ले यास बोलावून घेतले. त्यावेळी देविदासची पत्नी नंदा, मुलगी रेखा बाळू साळवे, साधना संतोष गायकवाड या देखील प्रभाकरच्या घरी आल्या. या सहा जणांनी प्रभाकर तुपेरे याला पाठीवर, पोटावर लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण केली. प्रभाकर तुपेरे याला सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आतड्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने व दवाखान्याचा खर्च परवडण्यासारखा नसल्याने त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले.
प्रभाकर तुपेरे याचा शुक्रवारी (ता.3) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मंगळवारी (ता.31) वरील सहा जणांविरुद्ध बेलवंडी पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार देण्यात आली होती. प्रभाकर तुपेरे यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर वरील सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संतोष भंडारे व बेलवंडी पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सर्व सहा आरोपींना अटक केली.