Friday, May 3, 2024
Homeनगरबेलापुरातील शिक्षकाचा प्रामाणिकपणा 9 कोटींचा सापडलेला धनादेश केला परत

बेलापुरातील शिक्षकाचा प्रामाणिकपणा 9 कोटींचा सापडलेला धनादेश केला परत

बेलापूर |वार्ताहर| Belapur

बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने रस्त्यावर सापडलेला नऊ कोटी रुपयांचा धनादेश बँकेला परत केला.

- Advertisement -

त्या शिक्षकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहेत.

केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षक जालिंदर विटनोर हे शाळेच्या कामानिमित्त उच्च माध्यमिक मंडळ, पुणे येथे गेले होते. शाळेचे कामकाज आटोपून रस्त्याने पायी जात असताना त्यांच्या पायाने एक कागद उडाला. तो कागद त्यांना चेकसारखा वाटला त्यामुळे त्यांनी तो उचलून हातात घेतला तर तो खरा चेक होता अन् तो ही चक्क नऊ कोटी रुपयाचा.

दि. 13 जानेवारी 2021 रोजी दिलेला चेक हा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून एलआयसी कार्यालयासाठी देण्यात आलेला होता. त्यांनी ही घटना तातडीने विद्यालयाचे प्राचार्य सोपान मगर व आपले नाशिक येथील नातेवाईक डॉ. नवनाथ तमनर यांना कळविली. दोघांनीही तो चेक महाराष्ट्र बँकेच्या शाखेत नेऊन देण्याचा सल्ला दिला. तो चेक घेऊन विटनोर हे महाराष्ट्र बँकेच्या शिवाजीनगर येथील शाखेत गेले.

तेथे शाखाधिकारी कुलकर्णी यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तातडीने सर्व स्टाफची बैठक बोलविली. बैठकीत जालिंदर विटनोर यांनी बँकेचे महाप्रबंधक सी. एन. कुलकर्णी व शाखाधिकारी पी. एच. पारख यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करून बँकेच्यावतीने विटनोर यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या