Wednesday, November 18, 2026
HomeनगरSangamner : पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न

Sangamner : पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रती फाडण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संबंधितांवर जोरदार टीका केली. पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे हा केविलवाणा प्रकार असून, लोकशाहीत वैचारिक मतभेद व्यक्त करताना सुसंस्कृतपणा आणि राजकीय शिष्टाचार जपणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

या प्रकरणावर भूमिका मांडताना थोरात म्हणाले की, लोकशाहीमध्ये कोणत्याही पुस्तकातील विचारांशी मतभेद असू शकतात. त्या विचारांवर टीका करण्याचा, असहमती व्यक्त करण्याचा आणि आपली भूमिका मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित पुस्तक वाचणे, त्यातील विचार समजून घेणे आणि त्यावर वैचारिक व बौद्धिक चर्चा करणे अपेक्षित आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पुस्तकाच्या प्रती फाडण्यासारखे कृत्य करणे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे.

या आंदोलनात आघाडीवर असलेल्या नेत्यांच्या राजकीय भूमिकेवरही थोरात यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, या कृतीत सहभागी असलेले बहुतांश लोक सत्तेच्या जवळ राहण्यासाठी आणि स्वार्थासाठी अनेक पक्ष बदलून आलेले आहेत. त्यांना स्वतःचा असा ठोस राजकीय इतिहास किंवा विचारधारा नाही. अशा लोकांनी सोनियाजींच्या त्यागावर आणि जीवनप्रवासावर भाष्य करणे हास्यास्पद आहे. राजकीय मतभेद असणे स्वाभाविक असले, तरी सार्वजनिक जीवनात किमान सुसंस्कृतपणा आणि राजकीय शिष्टाचार पाळले गेले पाहिजेत.

सोनिया गांधी यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनप्रवासाचा संदर्भ देताना थोरात म्हणाले, आम्ही सोनियाजींचा त्याग, त्यांचा खडतर संघर्ष आणि देशाप्रती असलेले अफाट समर्पण जवळून पाहिले आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. आपल्या जीवनप्रवासातील अनुभव आणि विचार त्यांनी या पुस्तकातून स्वतःच्या शब्दांत वाचकांसमोर मांडले आहेत. त्यामुळे पुस्तकाबाबत कोणाचे आक्षेप असतील, तर त्यांनी ते वाचून त्यातील मुद्द्यांवर वैचारिक चर्चा करावी. पुस्तकाच्या प्रती फाडून विरोध व्यक्त करणे योग्य नाही.

दरम्यान, पुस्तकाच्या प्रती फाडल्यामुळे त्याबद्दल वाचकांमध्ये रोष निर्माण होईल, असे विरोधकांना वाटत असेल; मात्र या प्रकारामुळे उलट पुस्तकाबद्दलची उत्सुकता वाढणार आहे. पुस्तकात नेमके काय आहे, सोनिया गांधी यांचा जीवनप्रवास कसा आहे आणि त्यांनी कोणते अनुभव मांडले आहेत, हे जाणून घेण्यासाठी अधिकाधिक लोक पुस्तक वाचतील. या घटनेमुळे पुस्तकाची चर्चा व्यापक होईल आणि मोठ्या संख्येने वाचक त्याकडे आकर्षित होतील, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. लोकशाहीत विचारांना विचारांनी उत्तर देण्याची परंपरा महत्त्वाची असते. राजकीय मतभेद असले तरी त्यातून वैयक्तिक द्वेष किंवा असंस्कृत वर्तन व्यक्त होऊ नये. राजकारणात सुसंस्कृतपणा आणि राजकीय शिष्टाचार टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका त्यांनी या निमित्ताने मांडली.

ताज्या बातम्या

७ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

0
मुंबई। वृत्तसंस्था Mumbai महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ७ डिसेंबर ते शुक्रवार, १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. विधानभवन येथे...