नाशिक | प्रतिनिधी Nashik
अस्वच्छ आणि अस्वास्थ्यकारक परिस्थितीत खाद्यपदार्थ तयार करणे तसेच कच्च्या मालाची व तयार खाद्यपदार्थांची साठवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली मार्केट येथील मे. सायंतारा साबुदाणा वडा व बटाटा कचोरी या खाद्य आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या आस्थापनेचे एफएसएसएआय नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने, सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील यांनी संबंधित आस्थापनेची तपासणी केली असता, खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रक्रिया अस्वच्छ वातावरणात सुरू असल्याचे आढळून आले. तसेच खाद्यपदार्थ आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची साठवणूकही अस्वच्छ परिस्थितीत केली जात असल्याचे तपासणीत निदर्शनास आले.
अशा अस्वच्छ परिस्थितीत तयार केलेले किंवा साठवलेले खाद्यपदार्थ दूषित होण्याची शक्यता असून त्यातून ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे हित लक्षात घेऊन प्रशासनाने संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तातडीने निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, अन्न व्यावसायिकांनी खाद्यपदार्थ तयार करताना परिसरात स्वच्छता राखणे, कच्चा माल व तयार खाद्यपदार्थांची सुरक्षित आणि योग्य पद्धतीने साठवणूक करणे आवश्यक आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या निकषांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी नाशिक विभागातील खाद्य आस्थापनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता किंवा सुरक्षिततेबाबत संशय असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच आवश्यक अन्न सुरक्षा परवाना अथवा नोंदणी प्राप्त केल्यानंतरच खाद्य व्यवसाय सुरू करावा आणि कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करावे, असे आवाहनही अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागातर्फे करण्यात आले आहे.




