मुंबई | Mumbai
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे अजित पवारांचा ज्या विमानाने अपघातात मृत्यू झाला त्याचे मालक व्ही. के. सिंग यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. त्यावरून भाजप नेत्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला होता.
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह महायुतीमधील नेत्यांनी देखील रोहित पवारांचे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यावर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात कोणीही चुकीची विधाने किंवा बिनबुडाचे आरोप केल्यास खपवून घेणार नाही”,असा इशारा दिला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, “लोकशाहीच्या नावाखाली काहीही खपवून घेतले जाणार नाही. जर कोणी मर्यादा सोडून बोलत असेल, तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे काम महायुतीतील (Mahayuti) तिन्ही पक्षांचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते एकवटून करतील”, असे भुजबळ यांनी म्हटले.
महायुतीतील नेत्यांनाही दिला महत्त्वाचा सल्ला
पुढे बोलताना भुजबळ यांनी महायुतीतील घटक पक्षांनाही सामंजस्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, “तिन्ही पक्षांचे मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आपसात एकमेकांविरोधात कोणतेही वावगे भाष्य करता कामा नये. काही अडचणी असतील तर त्या जाहीर न बोलता थेट मुख्यमंत्री (CM) किंवा आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मांडाव्यात”, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मदतीबाबत दिली महत्त्वाची माहिती
यावेळी भुजबळ यांनी आज (बुधवारी) झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीची माहिती देताना म्हटले की, तांत्रिक कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांना अग्रीम (आगाऊ) रक्कम मिळाली नसेल, त्या तांत्रिक अडचणी ताबडतोब दूर करून त्यांना मदत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण आणि मनरेगाच्या माध्यमातून कामे करून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या कामांमध्ये लोकसहभाग वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. जिल्हा नियोजन समिती (DPDC) लवकरात लवकर स्थापन करण्यासाठी नावे मागवण्यात आली असून, विविध महामंडळांवरील सभासदांच्या नियुक्त्याही तातडीने करण्याचा विचार सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.




