मुंबई | Mumbai
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना चुकून बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या पोस्टला प्रतिसाद देताना राऊत यांनी ‘बकवास लेकाचे’ अशी दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली. दरम्यान, मुंबई महापालिकेत ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी आंदोलन करत शायना एनसी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध करताना नेमकं काय घडलं?
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या उल्लेखावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. या पुस्तकात सावरकरांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत निषेध नोंदवला.
या पत्रकार परिषदेला शायना एनसी, संजय निरुपम आणि आनंद दुबे यांच्यासह शिवसेनेचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती आणि काही छायाचित्रे फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची मागणीही करण्यात आली. मात्र, निषेध व्यक्त करताना शायना एनसी यांच्या हातून मोठी चूक झाली. त्यांनी फाडलेल्या छायाचित्रांपैकी एका छायाचित्रात बाळासाहेब ठाकरे दिसत होते. हे लक्षात येताच त्यांनी फोटो फाडणे थांबवले आणि तो कागद इतर कागदांखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.
संजय राऊतांची दोन शब्दांत प्रतिक्रिया
या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाजमाध्यमांवरून आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या घटनेवरून शिंदे गटावर टीका करणारी पोस्ट केली होती. या पोस्टला प्रतिसाद देताना राऊत यांनी ‘बकवास लेकाचे’ असे दोन शब्द लिहिले. अतुल लोंढे यांनी आपल्या पोस्टमध्ये शिंदे गटाच्या नेत्यांनी बाळासाहेबांचा फोटो जाणीवपूर्वक फाडल्याचा आरोप केला होता. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाळासाहेबांच्या नावाचा राजकीय फायदा घेतल्याची टीकाही त्यांनी केली. या पोस्टला राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला आणखी उधाण आले.
हे जिथे दिसतील तिथे यांना ठोका: बोला शिंदे, ही असली अवलाद घेऊन तुम्ही बाळासाहेबांचा विचार वाढवताय? ……….. अमित शहा यांच्या शिंदे सेनेचे लोक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहेत.. कारण हे सगळे भाडोत्री आहेत, बरे झाले हे काळतोंडे आणि पांढऱ्या पायाचे लोक पळून गेले! याना ना कोणता विचार ना नैतिकता, ना एकच नेता ना निष्ठा.. मा. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांच्या ढुंगणावर जाहिरपणे चाबकाचे फटके मारले पाहिजेत! मला आशा आहे मराठी माणूस तरी माझ्या या भाषेवर आक्षेप घेणार नाही! @mieknathshinde @AmitShah @Dev_Fadnavis @AUThackeray https://t.co/WEnWhwyCWc— Sanjay Raut (@rautsanjay61) November 18, 2026
‘बाळासाहेब आमचे दैवत’; शायना एनसींचे स्पष्टीकरण
या घटनेवरून वाद निर्माण झाल्यानंतर शायना एनसी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत असून त्यांचे विचार घेऊनच आम्ही पुढे जात आहोत, असे त्यांनी सांगितले. ‘आम्ही बाळासाहेबांचा फोटो फाडलेला नाही, तर मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला आहे. एकदा नाही तर दहा वेळा त्यांचा फोटो फाडू. विरोधकांकडून चुकीचा नॅरेटिव्ह पसरवला जात आहे. आमची पत्रकार परिषद नीट ऐका आणि पाहा,’ असे स्पष्टीकरण शायना एनसी यांनी दिले.
एकनाथ शिंदेंनी विधानभवनात बोलावले
दरम्यान या प्रकरणाने वातावरण तापल्यानंतर शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रवक्ता शायना एन सी यांना विधान भवनात भेटण्यासाठी बोलवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शायना एन सी यांनी पत्रकार परीषदेत मनिशंकर अय्यर यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चप्पल मारतानाचा फोटो फाडला होता. या प्रकरणी विरोधकांनी आक्रमक निदर्शने सुरू केली आहेत. या वादावर शायना एन सी यांना बोलावण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.




