अहिल्यानगर (प्रतिनिधी)
श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेटमधील सुमारे १५ कोटी ५२ लाख रूपयांच्या फसवणूक प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका संचालकाला अटक केली आहे. दिनेश शिवनाथ वैद्य (वय ४७, रा. बालमटाकळी, ता. शेवगाव) असे अटक करण्यात आलेल्या संचालकाचे नाव असून न्यायालयाने त्याला ११ सप्टेंबरपर्यंत (तीन दिवसांची) पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील संचालक व व्यवस्थापक यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून ठेवीदारांना चुकीची माहिती दिली, खोटी आश्वासने दिली आणि जास्त परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर ठेवीदारांनी ठेवलेल्या रकमा परत न करता त्यांची फसवणूक करून विश्वासघात केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी सुरूवातीला सन २०२५ मध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी आणि अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. या सर्व गुन्ह्यांचा एकत्रित तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे तपास करीत आहेत.
या प्रकरणात मंदाकीनी रंगनाथ वैद्य, मयुर रंगनाथ वैद्य, शान्तलींग नागनाथ साखरे, नितीन सोपानराव तुपे, जयशाली मयुर वैद्य, राम लक्ष्मण पोपळघट, किशोर अनिल सुरवसे, दिनेश शिवनाथ वैद्य, योगेश तुकाराम गायकवाड, अनिल कचरू तिजोरे, पार्वती महादेव राऊत, वैशाली योगेश गायकवाड आणि अविनाश सुधाकर आंधळे यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे सर्व संशयित बालमटाकळी व पाथर्डी परिसरातील रहिवासी आहेत.
गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित पसार आहेत. दरम्यान, दिनेश वैद्य याच्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. मंगळवारी (८ सप्टेंबर) त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
१५.५२ कोटींची फसवणूक
श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट संस्थेच्या फसवणूक प्रकरणी दाखल चारही गुन्ह्यांचा एकत्रित तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून या प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येत आहे. फॉरेन्सिक ऑडिटचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यामध्ये आतापर्यंत सुमारे १५ कोटी ५२ लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या संस्थेमध्ये ज्या ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत उपस्थित राहून आपले जबाब नोंदवावेत, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी केले आहे.




