Thursday, July 9, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा निम्मे भरले, मुळा नदीला पूर

Bhandardara : भंडारदरा निम्मे भरले, मुळा नदीला पूर

घाटघर 13, रतनवाडीत तब्बल 12 इंच पाऊस

निळवंडेत 26 टक्के पाणीसाठा

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव सुरू असल्याने धरणात वेगाने नवीन पाण्याची आवक होत आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरण काल सायंकाळी 5 वाजता निम्मे झाले. काल सायंकाळी पाणीसाठा 5604 दलघफू (50.76 टक्के) झाला होता. वाकीचा ओव्हरफ्लो वाढला असून निळवंडेतही आवक वाढल्याने हे धरण 25 टक्क्यांवर गेले आहे.

भंडारदरा धरण पाणलोटात सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारपर्यंत पावसाने धुमाकूळ घातला होता. धो धो पाऊस कोसळत असल्याने डोंगरदर्‍यांमधील धबधब्यांनी आक्राळविक्राळ रूप धारण केले होते. छोट्या नद्या, ओढे नाल्यांना पूर आला असून धरणात विसावत असल्याने आता तासागणिक भंडारदर्‍याचे पोट फुगू लागले आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरा धरणात विक्रमी 1147 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे पाणीसाठा 5046 दलघफू (45.71टक्के) झाला होता. त्यानंतर काल मंगळवारी दिवसभरात पाऊस सुरू असल्याने 558 दलघफू नवीन पाण्याची भर पडली.

परिणामी धरणातील पाणीसाठा 5604 दलघफू (50.76टक्के) झाला होता. अजूनही पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक होत आहे. गत आठवड्यापूर्वी भंडारदरा पाणलोटात पाऊस नव्हता. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. पण गत पाचसहा दिवसांपासून मान्सूनने मुक्काम ठोकल्याने म्हणता म्हणता नूर बदलला आणि सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाण्याची आवक झाली.

निळवंडेतही आवक वाढली आहे. 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 2116 दलघफू (25.38टक्के) पाणीसाठा झाला होता. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा 26 टक्क्यांवर गेला होता. दरम्यान, धो-धो पाऊस कोसळत असल्याने झाडे पडली आहेत. काही घरांच्या कौलांचे नुकसान झाले आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला असून डोंगरदर्‍यात राहणारा आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत. तसेच भातरोपांचे प्रचंड नुकसान झाले ओ. तसेच भात खाचरांच्या बंदिस्ती उद्ध्वस्त झाल्या आहेत.

मुळात 37875 क्युसेकने आवक

साठा 40 टक्क्यांवर जाणार

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरण पाणलोटातील अकोलेतील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात अतिवृष्टी होत असल्याने काल दुपारपासून अकोलेतील मुळा नदीला पूर वाढला आहे. सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग केवळ 13836 क्युसेक होता. पण धो धो पाऊस कोसळत असल्याने क्षणाक्षणाला मुळाचा विसर्ग वाढत होता. दुपारी 12 वाजता हा विसर्ग 29533 क्युसेक होता. त्यानंतर दुपारी 3 वाजता हा विसर्ग 37875 क्युसेकवर पोहचला होता.

मुळा नदीला पूर आल्याने मुळा धरणात विक्रमी आवक होत आहे. उद्याही आजच्यापेक्षा अधिक आवक होणार आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढणार आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 7693 दलघफू झाला होता. आवक पाहता आज रात्री उशीरापर्यंत हा पाणीसाठा 40 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुरामुळे लहीत खुर्द-लहीत बुद्रुक जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून दोन्ही गावांमधील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. पुराचे पाणी कोतूळ येथील कोतूळेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. तसेच शेती जलमय झाली असून प्रचंड नुकसान झाले आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा रविवारी सायंकाळी 6356 दलघफू (24.44टक्के) होता. सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा 6469 दलघफू होता.

कुकडीत विक्रमी 4333 दलघफू पाण्याची आवक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कुकडी प्रकल्पातील धरण पाणलोट क्षेत्रात गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत प्रकल्पातील धरणांत उपयुक्त पाणीसाठा 7181.15 दलघफू (24.20टक्के) झाला होता. सायंकाळी 7 वाजता हा पाणीसाठा 25 टक्क्यांवर गेला आहे.

गतवर्षी या धरणात यंदाच्या दुप्पट पाणीसाठा म्हणजे 13022 दलघफू (44 टक्के) होता. सोमवारी सायंकाळी संपलेल्या 34 तासांत 1731 दलघफू विक्रमी पाणी नव्याने दाखल झाले.त्यामुळे समहू धरणांतील उपयुक्त पाणीसाठा 4780 दलघफू (16.11 टक्के) झाला होता. काल मंगळवारी संपलेल्या 24 तासांत विक्रमी 3094.61 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे या प्रकल्पातील पाणीसाठा 6258.41 दलघफू (21.09 टक्के) झाला होता. काल दुपारी यात आणखी 1238.87 दलघफू नवीन पाण्याची भर पडली. त्यामुळे हा पाणीसाठा 7181.15 दलघफू (24.20 टक्के) झाला होता.
कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण असलेल्या डिंभेत सोमवारी 512 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. तर मंगळवार सायंकाळपर्यंत आणखी भर पडली. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा 3312 दलघफू (27 टक्के) झाला. इतर धरणातही आवक होत आहे. घोड धरणातील पाणीसाठा मायनस होता. आता या धरणात 4.15 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

आढळात 37 टक्के पाणीसाठा
गत दोन दिवसांपासून पाणलोटात पाऊस होत असल्याने आढळा धरणात नव्याने पाण्याची आवक होत आहे.

1060 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 389 (36.70 टक्के)दलघफू पाणीसाठा झाला होता. काल सकाळी हा पाणीसाठा 336 दलघफू होता.

डिंभे धरण-27 टक्के
येडगाव 49.16 टक्के
माणिकडोह 21.35 टक्के
वडज 67.32 टक्के
चिल्हेवाडी 54.52 टक्के
घोड 4.15 टक्के

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरण 65 टक्के भरले; निळवंडेत ‘एवढा’ पाणीसाठा

0
अतिवृष्टीमुळे भातरोपे, बांधांचे प्रचंड नुकसान, पंचनाम्याची मागणी भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव केल्याने धरणात वेगाने नवीन...