मुंबई | Mumbai
नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. खरात याने अनेक महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना यामुळे आता अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एक मोठा दावा केला आहे.
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला ते चांगलंच झालं, पण केवळ त्यांच्यापर्यंतच हे प्रकरण नाही. याप्रकरणात अनेक उच्चपसदस्थ अधिकारी आहेत, असा खळबळजनक दावा जाधव यांनी केला. राज्यभरात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावरुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी परखड भाष्य केलं. पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या, म्हणत सखोल चौकशीची मागणी केली. त्यानंतर, आता भास्कर जाधव यांनीही अनेक दावे केले आहेत.
अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच SIT नेमण्यात आली आहे. मात्र, निम्मे मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचे नव्हते. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आले, अन्यथा हे प्रकरण सरकारने प्रकरण दाबले असते, असा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय. तसेच, याप्रकरणी SIT कधी नेमली याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.
राजीनामा घेऊन सरकारने विषयावरील लक्ष दुसरीकडे वळवू नये
भास्कर जाधव म्हणाले, अधिवेशन काळात सरकारने याबाबत वस्तुस्थिती मांडणे गरजेचे होते. कारण, यात फक्त रुपाली चाकणकर आणि राजकीय पुढारी आहेत असे नाही, यात उच्चपदस्थ अधिकारी देखील असून अशोक खरातची उठबस करण्यात ते गुंतले आहेत. केवळ चाकणकर यांचा राजीनामा घेऊन सरकारने या विषयावरील लक्ष दुसरीकडे वळवू नये, राजीनामा झाला म्हणजे प्रकरण संपले असे समजू नये. सरकारमधले अनेक मंत्री आणि अधिकारी यात असल्याने हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत आहे.
निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं
खरात प्रकरणात आत्ता एसआयटी नेमल्याचं सांगितलं जातंय, पण अधिवेशनाच्या आधी SIT नेमली आहे. मात्र, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे प्रकरण बाहेर आलं अन्यथा हे प्रकरण सरकारने प्रकरण दाबलं असतं. या प्रकरणात आयएएस, IPS अधिकारी आहेत. हे प्रकरण पोलिसांना देखील माहित होतं, म्हणून हे प्रकरण बाहेर आलं नाही, असा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी केलाय. त्यामुळे, हे प्रकरण तडीस जावं यासाठी आमचा प्रयत्न असेल. मात्र, सरकारची एकूण वृत्ती पाहून काही पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या फाईल्स आपल्या ढुंगणाखाली दाबून ठेवून ते राजकीय फायद्यासाठी वापरतील, असा दावाही भास्कर जाधव यांनी केलाय.
राजकीय पुढाऱ्यांना अघोरी विद्या आणि अघोरी प्रकार कशाला लागतात
राजकीय पुढाऱ्यांना अघोरी विद्या आणि अघोरी प्रकार कशाला लागतात हे कळत नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन असे शेण खाणाऱ्या लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे. पण, या सरकार कडून ही अपेक्षा नाही. आमचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सांगतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून उर बडवतो. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे करतो आणि दुसऱ्या बाजूला काय सुरू आहे याचा विचार करणे गरजेचे असल्याचेही मत भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेतून मांडले.





