Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधभाऊच्या अथक प्रयत्न व कष्टाला ग्रह रेषांची साथ

भाऊच्या अथक प्रयत्न व कष्टाला ग्रह रेषांची साथ

प्रफुुुल्ल कुलकर्णी – ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड – 8888747274

भालचंद्र पांडुरंग कदम यांचा जन्म: 12 जून 1972 रोजी झाला. भाऊ नावाने लोकप्रिय असलेले हरहुन्नरी विनोदी अभिनेते म्हणून त्यांनी मराठी प्रेक्षकांत मोठी लोकप्रियता कमावली आहे. 1991 पासून नाटकातून अभिनयाला सुरूवात केली. 500 हून अधिक नाट्यप्रयोगांमध्ये त्यांनी अभिनय केला.

- Advertisement -

टिव्ही वाहिनीवरील ‘फू बाई फू’च्या विनोदी भूमिकांमुळे प्रसिद्ध झाले. मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये बालपण गेलेल्या भाऊचा स्वभाव बालपणापासूनच लाजाळू आणि शांत. वडिलांच्या अकाली निधनानंतर वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. भाऊ घरखर्चासाठी मतदार नावनोंदणीचे काम करत होते. पण त्यात भागत नसल्याने त्यांनी भावाच्या साथीने पानटपरी सुरु केली.

एकवेळ अशी होती की अभिनयाची मोठी संधी मिळत नसल्याने त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचा विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरले.

भाऊचा नाटकांमधील अभिनय पाहून काहींनी त्यांना ‘फू बाई फू’ या हास्यमालिकेत कामासाठी सुचवले. मात्र सलग दोनदा ‘फू बाई फू’ची ऑफर नाकारली. लाजाळू स्वभाव असल्याने ‘मला हे काम जमणार नाही’ असे त्यांना वाटायचे. मात्र तिसर्‍यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि सहाव्या पर्वाचे ते विजेते ठरले.

पुढे ‘चला हवा येऊ द्या’ मधून निलेश साबळेंसोबत प्रेक्षकांना हसविणार्‍या भाऊने तर कमालच केली. आपला अभिनय आणि अचूक टाईमींगच्या जोरावर ते उभ्या महाराष्ट्राला हसवत आहेतचे प्रचंड प्रेम त्यांनी कमावले.

त्यांनी टाइमपास 2, टाइमपास, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विरुद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, चांदी, मस्त चाललंय आमचं, बाळकडू असे चित्रपटही केले आहेत. ‘फरारी की सवारी’ या हिंदी चित्रपटातही ते झळकले. यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही त्यांच्यातील साधे साधेपणा कायम आहे.

उजव्या व डाव्या हातावरील भविष्य

मस्तक रेषा- भाऊ कदम यांच्या दोन्ही हातावरील मस्तक रेषा पूर्ण लांबीची व हातावर वरच्या मंगळ ग्रहा वर थेट आडवी गेली आहे. उजव्या हातावरील एक फाटा मस्तक रेषेतून खाली चंद्र ग्रहावर आला आहे. चंद्र ग्रहावर आलेली मस्तक रेषेने भाऊ यांना अभिनयाचे गुण प्रदान केले आहेत. दोन्ही हातावरची मस्तक रेषा शुभकारक आहे. ही रेषा हुशारी तर प्रदान करतेच शिवाय नियमितपणा व कष्ट घेण्यासाठी कायम प्रेरित करते. अशी मस्तक रेषा हातावर असता असे लोक कायम त्यांच्या उद्योगात मग्न असतात. यांच्याकडे आळशीपणा अभावानेच असतो. डाव्या हातावरची मस्तक रेषा ही चंद्रावर उतरली आहे. ती जन्मतःच अभिनयाचे कौशल्य प्रदान करते. चंद्र म्हणजे मन, कल्पना, कल्पना विस्तार व त्यातूनच अभिनय कौशल्याची उपजत कला लाभली आहे. दोन्ही हातावरची मस्तक रेषा व आयुष्य रेषा वयाच्या 28 व 30 वयापर्यंत एकत्र आहे. त्यामुळे स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता नव्हती. घरातील मोठे जे सांगतील, त्याप्रमाणे काम करण्याच म्हणजेच ते आज्ञेत होते. असे घडते ते केवळ आयुष्यरेषा व मस्तक रेषा जोपर्यंत हातावर एकत्र आहेत तोपर्यंत. जेंव्हा मस्तक रेषा आयुष्य रेषेतून स्वतंत्र होते त्या वेळेस किंवा त्या वय वर्षात यांना स्वतंत्र निर्णय क्षमता बहाल होते.

भाग्य रेषा – उजव्या हातावरील भाग्य रेषा मनगटापासून आहे. पण ती मस्तक रेषेपर्यंत जाड व पसरट आहे. जाड व पसरट असल्याने कर्माच्या म्हणजे उजव्या हातावरील भाग्य रेषा वयाच्या 35 पर्यंत यथातथा, तुटपुंजे उत्पन्न देणारी आहे. मस्तक रेषे नंतर मात्र भाग्य रेषेने तीचा पोत बदलला आहे. ती बारीक व चमकदार होऊन मस्तक रेषेपासून पुढे हृदय रेषेपर्यंत गेलेली आहे. हृदय रेषे पासूनची भाग्य रेषा शनी, रवीच्या बोटापर्यंत गेल्यामुळे त्यांना वयाच्या 55 वर्षानंतर मान, सन्मान, कर्तृत्व व चंदेरी दुनियेत झालेले मोठं नाव व त्या नावाच्या वलयासोबत त्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. डाव्या हातावर भाग्य रेषा स्पष्ट नाही. परंतु वयाच्या 48 वर्षी भाग्य रेषा रुपी उत्कर्ष रेषा डाव्या संचिताच्या हातावर आयुष्य रेषेतून उगम पाऊन उत्कर्ष रेषा हृदय रेषे पर्यंत गेलेली आहे. म्हणजे त्यांच्या संचितामध्ये भाग्यामध्ये त्यांचा मोठा भाग्योदय व सर्वोच्य मन सन्मान प्रसिद्धीसाठी वयाचे 48 वर्ष डाव्या हातावरील उत्कर्ष रेषेने अधोलीखीत केले आहे.

रवी रेषा – उजव्या हातावरील रवी रेषा हृदय रेषेच्या अलीकडून थोडी अस्पष्ट व नंतर हृदय रेषेपासून अति शुभ स्पष्ट होऊन बुध व रवी ग्रहांच्या बोटांच्या पेर्‍यात गेल्यामुळे देशातच नव्हे तर दूर देशी नांव होते, मान सन्मान मिळतो. डाव्या हातावरची रवी रेषा उजव्या हातावरील रेषेपेक्षा थोड्या कमी दर्जाची आहे. त्यामुळे त्यांची अभिनयातील प्रसिद्धी व त्या

प्रसिद्धी मागे येणारा पैसा याचे सर्व श्रेय त्यांच्या मेहनतीला व कष्टाला आहे. त्यासाठी भाऊंच्या हातावरील मस्तक रेषा न थकता कठोर मेहेनत घेणारी, विनाकारण दिवा स्वप्न न पहाणारी परंतु अत्यंत व्यवहारी आहे. अश्या दोनही हातावरच्या मस्तक रेषेमुळे प्रेरणा मिळत गेली व कठोर मेहनतीचे फळ त्यांच्या हातावरील शुभ अश्या रवी रेषेने प्रदान केले आहे.

हृदय रेषा – हातावरील हृदय रेषा सुद्धा अत्यंत व्यवहारीपणा दर्शविते. व्यवहारात भाऊंना त्यांच्या भावना आडव्या येत नाहीत. त्यामुळेच त्यांना स्वतःचा व्यवसायातील स्वार्थ कळतो. त्यांना आपल्या अभिनयातील कौशल्याची किंमत समोरचा किती वसूल करणार हे ते जाणून असतात. त्यामुळे व्यवहारात भावना किंवा मन आडवे येत नाही .

ग्रहस्थिती – हातावरील गुरु ग्रहांसहित बाकीच्या सर्व ग्रहांची उत्तम साथ आहे, हातावरील ग्रहांचे उंचवटे प्रमाणशीर आहेत, अंगठा मोठा व तळहातापेक्षा बोटे आखूड असल्याने ठाम व जलद निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मात्र मस्तक रेषा अति व्यवहारी असल्याने कुठलाही मोठा निर्णय घेण्यासाठी ते थोडा वेळ घेतात. त्यातच अंगठ्यावरील दुसर्‍या पेर्‍यावर एक ठळक आडवी रेषा असल्याने काही वेळेस निर्णयाची घाई होते. परंतु त्यात भाग्याची साथ असल्याने नुकसान फारसे होत नाही. उजव्या हातावरील गुरुचे बोट टोकाला किंचित वाकडे असल्याने दुसर्‍यावर विश्वास ठेवण्यास यांना वेळ लागतो.

मंगळ रेषा – दोन्ही हातावर वयाच्या 40 व्या वर्षापासून मंगळ रेषेचा उगम आयुष्य रेषेच्या आत झाला आहे. त्यामुळे वयाच्या 40 व्या वर्षानंतर त्यांना कमालीची ऊर्जा प्राप्त झाली आहे. दोन दोन शिफ्टमधेही न थकता काम हे त्याचे उदाहरण होय. उजव्या हातावरील मंगळ रेषा आयुष्य रेषे जवळ वयाच्या 66 वर्षापर्यंत आहे. म्हणजे ते न थकता किमान 16 वर्ष काम करणार आहेत.

आयुष्य रेषा – दोन्ही हातावरील आयुष्य रेषा अखंड आहे. परंतु ती थोड्या आकाराला बाकीच्या रेषेपेक्षा जाड आहेत. आयुष्य रेषा त्या व्यक्तीला काटकपणा प्रदान करते, निरोगी ठेवते. प्रतिकार शक्ती व आजार हे आयुष्य रेषेवरून पाहता येतात. येथे त्यांची आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकारशक्ती थोडी कमी राहणारी आहे. त्यांचा उजवा कर्माचा हात भाग्यशाली आहे. त्या वर आडव्या रेषा नाहीत. ज्या रेषा आहेत त्यांचा उगम आणि शेवट शुभकारक आहे (भाग्य रेषा सोडून ). त्यांच्या नशिबाने दिले असे म्हणता येणार नाही. परंतु अथक प्रयत्न व कष्टाला ग्रह रेषांनी साथ दिली आहे. त्यांना जुळा भाऊ आहे. त्या दोघांमध्ये भाऊ भाग्यवान ठरले. कारण जुळ्या किंवा तिळ्यांचे भाग्य एकसारखे कधीही असत नाही. जरी जुळ्यांची जन्म पत्रिका एक सारखी असली तरीही भाग्य नेहमी वेगेळे असते. कारण प्रत्येत व्यक्ती जन्माला येतांना आपले संचित आणि भाग्य घेऊनच येते. हे भाग्य प्रत्येकाच्या हातावर रेषा रुपी नकाशाने ब्रह्माने मुद्रित केलेले असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या