Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधपुण्यदायी व फलदायी महालक्ष्मी व्रत

पुण्यदायी व फलदायी महालक्ष्मी व्रत

मराठी संस्कृतीत मार्गशीर्ष महिना महत्त्वाचा महिना मानला गेला आहे. मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी, गीता जयंती हे सण साजरे केले जात असून प्रामुख्याने गुरुवारचे व्रत महत्त्वाचे असते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीषातल्या चारही गुरूवारी व्रत करून घरात सुख, समृद्धी नांदावी यासाठी विशेष प्रार्थना केली जाते. तसेच शेवटच्या गुरूवारी महिलांना, कुमारिकांना, तरूणींना घरी आमंत्रण देऊन हळदी कुंकू व वाण देऊन या व्रताची दरवर्षी सांगता करण्याची प्रथा आहे. आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरूवार त्यानिमीत्त जाणून घेऊ यात संपूर्ण पूजाविधी…

पूजाविधी

- Advertisement -

पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवावा. चारीबाजूला रांगोळी काढावी.

चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे. त्यावर हळद-कुंकू वाहावे.

पाण्याच्या तांब्यात दूर्वा, सुपारी आणि शिक्का सोडावा. कलशाला बाहेरून हळद-कुंकवाचे बोटं लावावे. तांब्याच्या नंतर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावा.

कलश चक्राकारावर ठेवावा. समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. लक्ष्मीसमोर दिवा लावावा. लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी.

फळं, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा. देवीला कमळाचे अथवा लाल फूल अर्पित करावे. लक्ष्मी पूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी.

श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे. व्रत कथा वाचावी. श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा) मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी.

संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करुन नैवेद्य दाखवावे. गायीसाठी एक पान वेगळं काढावे. नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे.

दुसर्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे, किंवा तुळशीच्य झाडाला घालावे.

शेवटच्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा.

व्रत करण्याचे नियम

  • या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे.

  • हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात.

  • व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार टाळावा.

  • हे व्रत करणार्‍या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळांचे सेवन करावे.

  • रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे.

  • पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं.

  • व्रताच्या दिवशी घरातील वातावण आनंदी असावं.

  • पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करवावी. मात्र उपास स्वत: करावा.

या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते. या मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते. या व्रत कथेमागे श्रद्धेचा भाग असतो.

त्याचप्रमाणे या उपवासात अनेक व्रतवैकल्प पूर्ण केले जातात. या कथेतून अनेक गोष्टी सुचित केल्या जातात त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये.

संपत्ती, सत्ता यातून गर्व वाढत जातो आणि गर्वाने उन्मत्त झालेली व्यक्ती कशी चुकीच्या मार्गावर जाते हे यात सांगण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे कथेत सांगितल्याप्रमाणे मीठाची गोष्ट ही अतिशय मार्मिक आहे. कोणत्याही गोष्टीची अती लोभ करू नये.

आयुष्यात जर सुख, समाधान हवे असेल तर त्यासाठी थोडी सहनशीलता आवश्यक आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना संयम बाळगणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या