भोकर |वार्ताहर| Bhokar
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतची ग्रामसभा विविध विकास कामे, ठेकेदारी, टक्केवारी, दारूबंदी आदी विषयावरून चांगलीच गाजली.सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शितल पटारे होत्या. मी एक महिला सरपंच आहे. म्हणून मला वेठीस धरू नका, असे आवाहन यावेळी सरपंच शितल पटारे यांनी करताच आम्ही वेठीस धरत नाही, तुम्ही सरपंच आहात ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ही विनाकारण ठेकेदारांना वेठीस धरू नका. कामे होवून दोन वर्ष होत आली तरी रक्कम अदा होईना. मग अपूर्ण असलेल्या घनकचरा निर्मुलन प्रकल्पाची रक्कम ग्रामसभेचा विरोध असताना ही कशी अदा झाली? असे अनेक प्रश्न रामदास शिंदे, सतीष शेळके, भाऊराव सुडके यांनी केल्याने ग्रामसभेत चांगलीच खडाजंगी झाली.
पूर्ण झालेल्या कामांची बिले का आदा केली जात नाही असा प्रश्न भाऊराव सुडके यांनी उपस्थित करताच रामदास शिंदे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी गावाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 24 तास विजपुरवठा करण्यासाठी अभिषेक शिंदे यांनी निवडणुकीपूर्वीच काम पूर्ण केलेले असताना आत्तापर्यंत 50 हजार का मागे ठेवले. त्यावर सरपंच पती प्रताप पटारे यांनी ग्रामपंचायतीच्या विहीरीपर्यंत वाढीव काम करायचे आहे. शिवाय तेथे जाण्यासाठी रॅम व कठडे बनवायचे आहे. त्यामुळे 50 हजार मागे राहीले असा खुलासा केला. घनकचरा निर्मूलन प्रकल्प अपूर्ण असल्याने ठेकेदारांना रक्कम अदा करू नये, असा ठराव असताना देखील ठेकदारांना रक्कम अदा करण्यात आली असल्याचा आरोप यावेळी सतीष शेळके यांनी केला.
वरिष्ठांच्या सुचनेनुसार रक्कम अदा केल्याचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे यांनी खुलासा करताच अद्याप काम अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी खड्डे झालेले नाहीत. तेथे विज कनेक्शन नाही. विज पम्प नाही. प्रकल्प कार्यान्वीत नसताना 80 टक्के रक्कम अदा कशी केली असा सवाल उपस्थित करताच सत्ताधारी अनुत्तरीत झाले. वस्तीपड प्रकरणात वारस नोंदी करताना ग्राममहसूल अधिकारी अधिकाराचा गैरवापर करत असल्याची तक्रार राधाकिसन विधाटे यांनी केली. गावात काही ठिकाणी रस्ते खोदून ठेवला अन् काम बंद का? याचा त्रास नागरीकांना होत आहे. त्याकडे तातडीने लक्ष द्या, कुणीही कुणाच्या प्रभागातील विकास कामात हस्तक्षेप करू नये, तसेच यापुढे दलितवस्तीचा निधी इतरत्र देवून वापरू देणार नसल्याचे रिपाईचे सुरेश अमोलिक यांनी सांगीतले. मुस्लीम दफनभूमी बद्दल मुन्वर सय्यद यांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र, मुस्लीम दफनभूमी विषयी ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची तक्रार मेहबुब पठाण व सतीष शेळके यांनी केली.
येथील पुरातन महादेव मंदिराचा जीर्णाद्धार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच शितल पटारे यांनी केले. त्यावर अगोदर गावात सुरू असलेल्या 35 लाखांच्या कामातून मिळणार्या रक्कमेतून कामास सुरूवात करा मग आम्ही वर्गणी देवू असा खोचक सल्ला भाऊराव सुडके यांनी दिला. काम न करणार्या ठेकेदारांवर कारवाई करून दुसर्यांना कामे द्या, अशी मागणी सतीष शेळके यांनी केली. पूर्वीपासून असणारा ठेकदार हा चांगले काम करत नाही. हे माहीती असताना त्याच ठेकेदाराला पुन्हा कामे कशी दिली जातात असा सवाल रामदास शिंदे यांनी उपस्थित केला. यावेळी जलजीवन योजनेच्या कामाबद्दल देखील चर्चा करण्यात आली.
श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लीव्हीग ग्रुप मार्फत गावच्या विकासासाठी, ग्राम स्वच्छतेसाठी, व्यसनमुक्तीसाठी, संद्रिय शेती आदी विषयांवर विविध प्रकल्प ग्रामस्तरावर राबविले जात असल्याचे आर्ट ऑफ लीव्हींगचे प्रकल्पाधिकारी संदीप कासार यांनी सांगितले. तर दारूबंदी विषयी भाऊराव सुडके लक्ष वेधले तर दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी सागर शिंदे यांनी केली.