Thursday, March 13, 2025
Homeनगरभोकरच्या ग्रामसभेत विविध विषयांवर वादळी चर्चा

भोकरच्या ग्रामसभेत विविध विषयांवर वादळी चर्चा

भोकर |वार्ताहर| Bhokar

ठेकेदारांना नोटीसा का काढल्या नाही, बी वन टेंडर केले असते तर ग्रामपंचायतीला 18 टक्क्यांचा लाभ झाला असता. ठेकेदारांकडून 21 टक्के मिळाल्याने बी वन टेंडर झाले नाही. पाणी फिल्टरचे पैसे घेतलेले असताना देखील अनेक दिवसांपासून बंद आहे. सरपंच, उपसरपंच मासिक मिटींगमध्ये सदस्यांना विचारात घेत नाही.अशा विविध तक्रारींनी भोकरची ग्रामसभा गाजली. सरपंच शितल पटारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस उपसरपंच सागर आहेर, ग्रामविकास अधिकरी प्रदीप ढुमणे, कृषी अधिकारी रूपाली काळे, सदस्य गिरीष मते, आप्पासाहेब जाधव, संदीप गांधले, काळू गायकवाड, विजय अमोलिक, भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊराव सुडके, संघटक सतीष शेळके, रामदास शिंदे, राहुल अभंग, सागर शिंदे, सुरेश अमोलिक, प्रताप पटारे, दत्तात्रय पटारे उपस्थित होते. यावेळी अनेक विभागांचे प्रमुख व काही ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

- Advertisement -

गेल्या वर्षीच्या ग्रामसभेत रामदास शिंदे यांनी ज्या घरकुल लाभार्थी ग्रामस्थांकडे जागा नसेल त्यांचे एकत्रीकरण करून सामुदायीकपणे पंडीत दिनदयाळ योजनेची प्रकरणे करा, सर्व रक्कम एकत्र करून शेती खरेदी करून त्यांना जागा उपलब्ध करून देवून घरकुलांचा लाभ द्या अशी सूचना केली होती. यास वर्ष होवून ही ग्रामपंचायतीने कुठलीच कारवाई न करता आता जागेअभावी घरकुल परत करण्याची नामुश्की का ओढावली, अजूनही वेळ गेलेली नाही, संबधितांना जागा उपलब्ध करून द्या, कुणालाही घरकुल लाभापासून वंचित ठेवू नका, जागेअभावी घरकुल रद्द करू नका असे रामदास शिंदे यावेळी म्हणाले.

गावच्या विकासाच्या दृष्टीने मंजूर असलेली कामे सुरू न झाल्याने गेल्या दोन महिन्यात झालेल्या ग्रामसभेत संबधीत ठेकेदारांना नोटीस देवून दुसर्‍या ठेकेदारांकडून काम करवून घेण्याचा ठराव झालेला असताना संबधीतांना लेखी नोटीस का दिली नाही? असा सवाल करत ही कामे बी वन पद्धतीने ई टेंडर केली असती तर ग्रामपंचायतीला 18 टक्क्यांचा लाभ झाला असता त्यात इतर कामे करता आली असती पण कमिशनचा टक्का वाढल्याने बी वन टेंडर केले नाही असा आरोप भाजपा ओबीसीचे सेलचे तालुकाध्यक्ष भाऊराव सुडके यांनी केला. त्यावर काही सदस्यांनी नावे घेवून आरोप करा, सरपंच, उपसरपंच मासिक बैठकीत आम्हाला विचारात घेत नसल्याचा आरोप सदस्य गिरीष मते यांनी केला. तसेच तुम्ही सदस्य आहात येथे ग्रामस्थांना बोलू द्या असे ग्रामविकास अधिकारी म्हणतातच आम्हाला मासिक मिटींगमध्ये बोलू दिले जात नाही. विचारात घेत नाहीत म्हणून येथे बोलत असल्याचे श्री. मते यांनी सांगितले.

त्यावर विकास कामांच्या टेंडरवेळी बी वन की ई-टेंडर यासाठी सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मासिक बैठकीत मतदान घेण्यात आले. त्यावेळी केवळ तीन सदस्यांनी ई टेंडरच्या बाजूने तर उर्वरीत बहुमतातील सदस्यांनी बी वन च्या बाजून मतदान केले, त्यावेळी अनेकांनी स्थानिक ठेकेदारांना संधी देण्यासाठी म्हणून बी वन पद्धतीने स्थानिक ठेकेदारांना कामे देण्यात आल्याचा खुलासा सरपंच शितल पटारे यांनी केला. पाच, दहा लाख रुपये खर्च करून सदस्य निवडून आलेले असल्याने ज्या त्या प्रभागातील सदस्यांना विचारात घेवून कामे देण्याची मागणी गंगाधर गायकवाड यांनी केली. यावेळी सामुदायिकपणे चहाच्या प्लास्टीक कपावर बंदी घालावी व अंमलबजावणी न करणारांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच मुस्लीम बांधवांच्या कब्रस्तानसाठी जागा देण्याच्या विषयावर ही चर्चा करण्यात आली.

सध्या उन्हाळा तोंडावर असताना जलजीवनचे काम ठप्प का? असा सवाल सागर शिंदे यांनी केला. त्यावर अद्याप 18 किमी अंतराची पाईपलाईन शिल्लक आहे. त्यातून सर्व मुख्य वाहीनी व उपवाहीनींचे काम करणार आहोत तसेच जलजीवन योजना या विषयावर स्वतंत्र ग्रामसभा घेवू असे आश्वासन श्री. ढुमणे यांनी दिले. तसेच ग्रामविकास अधिकार्‍यांना दोन गावांचा कारभार असल्याने काम उरक होत नाही, त्यामुळे अनेक कामे प्रलंबीत असल्याचे सरपंच पती प्रताप पटारे यांनी सांगितले. तर एक गाव एक ग्रामविकास अधिकारी नेमा. त्यासाठी प्रयत्न करा, वसुल होईना, कर्मचार्‍यांचे पगार होईना अशी खंत सफाई कर्मचारी बनीचंद आहिरे यांनी व्यक्त केली. तर आमच्याकडून शुद्ध पाण्यासाठी आगाऊ पैसे घेतलेले असताना तीन महिन्यांपासून आरओ प्लँट बंद असल्याची तक्रार अनिता पाचपिंड यांनी केली.

गावात पाणीटंचाई होती म्हणून तत्कालीन सदस्य मंडळ व मान्यवरांच्या विनंतीला मान देवून स्वखर्चाने सिंगलफेज लाईनचे काम केले, त्या रक्कमेतील पन्नास हजार अद्याप का दिले नाही? अधिकार्‍यांची ना हरकत असताना ग्रामपंचायत स्तरावर कोणी विरोध केला? असा सवाल अभिषेक शिंदे यांनी केला तर माझे काम पूर्ण झालेले असताना अधिकार्‍यांनी ना हरकत दिली असल्याने पैसे मिळत नसल्याची तक्रार सम्राट माळवदे यांनी केली. सुमारे अडीच तास चाललेल्या या ग्रामसभेत नेहमीचेच कलाकार बोलत असल्याने सर्वसामान्य नागरीकांना त्यांचे विषय मांडता न आल्याने अनेकांनी खंत व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. पुढच्या महिन्यात पुन्हा ग्रामसभा घेण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. एकंदरीत विविध विषयांवर ग्रामसभा वादळी ठरली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...