नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शाळेत वासनांध शिक्षकांनी (Teacher) हैदोस घातल्याचा प्रकार इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) सर्वतीर्थ टाकेद येथे पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक अर्जुन गभाजी हरिश्चंद्रे याने आठवीतील विद्यार्थिनीचा विनयभंग केला असून, या प्रकरणी घोटी पोलिसांनी (Ghoti Police) त्याला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, याच शाळेच्या माजी मुख्याध्यापकाला बलात्काराच्या गुन्ह्यात नुकतीच जन्मठेपेची शिक्षा झाली असतानाही, शिक्षकांमध्ये कायद्याचा धाक उरला नसल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २८) पीडित विद्यार्थिनी भावासोबत शाळेत (School) काही कागदपत्रांवर मुख्याध्यापकांची सही घेण्यासाठी गेली होती. यावेळी संशयित शिक्षक अर्जुन हरिश्चंद्रे याने “मुख्याध्यापक मीटिंगमध्ये आहेत, मी सही आणून देतो” असे सांगत भावाला बाहेर थांबवले आणि विद्यार्थिनीला आत नेले. तिथे एकांत गाठून या नराधमाने विद्यार्थिनीला लज्जा वाटेल असे कृत्य करत अश्लिल भाषेचा वापर केला. “तू आता मोठी झाली आहेस,” असे म्हणत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने स्वतःची सुटका करून घेत तिथून पळ काढला. पीडितेचे पालक बुधवारी सकाळी बाहेरगावाहून परतल्यानंतर हा प्रकार समोर आला.
मुलगी रडत असल्याचे पाहून पालकांनी विचारपूस केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. संतप्त ग्रामस्थांनी तत्काळ शाळेत धाव घेऊन शिक्षकाला जाब विचारला, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोटी पोलीस ठाण्याचे (Ghoti Police Station) निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कांचन भोजने यांनी संशयित अर्जुन हरिश्चंद्रे याला ताब्यात घेतले. त्याच्यावर पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाप धुवायचे सोडून पुन्हा काळीमा!
या शाळेचा इतिहास अत्यंत कलंकित ठरला आहे. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी याच शाळेच्या मुख्याध्यापकाने १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता, ज्यासाठी त्याला नुकतीच जन्मठेप सुनावण्यात आली आहे. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच, दुसरा शिक्षक याच वाटेने गेल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण आहे.
शिक्षण विभागाचा अंकुश कुठे?
इगतपुरी तालुक्यातील टाकेद आणि अडसरे परिसरात वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे आता शाळांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आरोपींना कठोर शिक्षा होत असतानाही शिक्षकांचे धाडस कसे होते? शिक्षण विभाग आणि प्रशासन अशा नराधमांना कायमचे घरी का पाठवत नाही? असे प्रश्न आता पालकांमधून विचारले जात आहेत.





