Thursday, May 2, 2024
Homeधुळेजामनेरच्या भोंदूबाबाला धुळ्यात अटक

जामनेरच्या भोंदूबाबाला धुळ्यात अटक

धुळे । dhule

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात येऊन हात चालाखीने सोन्याचे दागिने गायब करणार्‍या भोंदू बाबाला देवपूर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील देवपूर भागातील नेहरू हाऊसिंग सोसायटीत राहणार्‍या सौ.किरण शेखर जडे (वय 42) यांच्याकडे अनोळखी भोंदू बाबा साधूच्या रुपात भिक्षा मागण्यासाठी व भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आला. तेव्हा त्यांनी भविष्य बघण्यासाठी त्याला घरात बोलवले. तेव्हा त्याने महिलेसह तिचे पतीला तुमचे सगळे चांगले करतो, असे सांगून हात चलाकी करून हातात कुंकू व तांदूळ घेऊन त्याची विभूती राख करून दाखविली. त्यानंतर मंत्र उच्चार करून महादेवाची छोटी पिंड प्रकट करून दाखवली व तुमच्याकडून मला काहीच नको, मी सोन्याची पूजा करून मंत्र मारून तुमचे परीक्षा घ्यायला आलो आहे, असे सांगून तुमच्या अंगावरील सोने द्या, सोबत नेणार नाहीत व संध्याकाळी जेवणासाठी तुमच्या घरी येतो. तुमच्या सोन्याची पूजा करून मंत्र मारून परत देतो व तुम्ही ते सोनं परिधान केल्यानंतर तुमचे सगळे कल्याण होईल व सुखी राहाल, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर सौ.जडे यांनी भोंदू बाबाच्या सांगण्याप्रमाणे त्याच्याकडे सोन्याचे तीन ग्राम वजनाचे कानातील टाप्स व सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असा एकूण 18 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने दिले व नंतर तो फरार झाला. संध्याकाळी जेवणासाठी वाट बघितली परंतु तो आलाच नाही. याप्रकरणी सौ. जडे यांच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता. पोलिसांनी सीसीटीव्ही वरून भोंदू बाबाचे फोटो मिळवून, त्याची माहिती काढली. तसेच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्याला देवपुरातील एकता नगरातून ताब्यात घेतले. भोंदू बाबाने त्याचे नाव नारायण किसन चव्हाण ( वय 35 रा.ओझर खुर्द, ता. जामनेर, जि. जळगाव) असे सांगितले. चौकशी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हातील 18 हजारांचे सोन्याचे दागिने व दुचाकी असा एकूण 68 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर व त्यांचे डीबी पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार पंकज चव्हाण, पोना. विश्वनाथ शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल किरण सावळे, सागर थाटसिंगारे, सौरभ कुटे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या