Sunday, May 5, 2024
Homeनगरभुईकोट किल्ला सुशोभीकरणाचा प्रस्ताव तातडीने तयार करावा

भुईकोट किल्ला सुशोभीकरणाचा प्रस्ताव तातडीने तयार करावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य शासनाने भूईकोट किल्ला सुशोभीकरण व दुरूस्तीसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. किल्ला दुरूस्ती व सुशोभीकरणासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. तातडीने किल्ला दुरूस्ती व सुशोभीकरणाचा आराखडा तयार करून लष्कर विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठकीत सूचना दिल्या.

- Advertisement -

भुईकोट किल्ला सुशोभीकरण व दुरूस्तीसाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या दालनात आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लष्कर विभागाचे अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, इतिहास प्रेमी भूषण देशमुख, वृक्षमित्र सुरेश खामकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शासनाकडून भुईकोट किल्ला दुरूस्तीसाठी निधी आला आहे. हत्ती दरवाजा सुशोभीकरणाचे काम, नेताजींच्या कक्षाकडे जाण्यासाठी इलेक्ट्रिक गाडीची सोय करणे, स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांची फोटो गॅलरी तयार करणे, झुलत्या पुलाची दुरूस्ती करणे याचबरोबर 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व महाराष्ट्र दिनी पोलीस परेड ग्राउंडवर होत असलेला झेंडावंदनाचा कार्यक्रम भूईकोट किल्ला याठिकाणी करण्यात यावा. तसेच या तीन झेंडावंदनाच्या दिवशी सात दिवस किल्ला सर्वांसाठी खुला करण्याची परवानगी मिळावी. याचबरोबर जॉगिंग ट्रॅक परिसरामध्ये लाईटची व्यवस्था करणे आदी विषयांवर लष्कराच्या अधिकार्‍यांसमवेत चर्चा झाली असून, लवकरच प्रस्ताव तयार करून या सर्व विषयांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीकडून किल्ला दुरूस्ती व सुशोभीकरणाचा आराखडा तयार करून तो लष्कर विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आ. जगताप यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या