मुंबई | Mumbai
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. नागपुरातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचा हा निर्णय सांगितला आहे. तर शरद पवारांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे कळवले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी शरद पवार गटाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी पक्षाचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना अचानकपणे प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिला आहे. डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी आराम करत आहे, असे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.
सलील देशमुख यांनी प्रकृतीचे कारण देत राजीनामा देत आहोत असे सांगितले असले तरी उद्या दुसऱ्या पक्षात जाणार आहे का यावर उत्तर देताना ते म्हणाले उद्याची परिस्थिती काय असेल ते माहित नाही. मात्र सध्या प्रकृतीच्या कारणांनी मी राजीनामा देत असल्याचे सुतवाच त्यांनी केले. सहा महिन्यानंतर प्रकृती बरी झाल्यानंतर मी परत जनतेच्या सेवेत हजर होणार असल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली.
सलील देशमुख यांनी राजीनाम्यात काय म्हंटले आहे?
सलील देशमुख यांनी पत्रात म्हटलं आहे की, ‘गेल्या २०-२२ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी पक्षात सक्रिय आहे. नागपूर जिल्हा, शहर व विदर्भ येथे प्रामुख्याने युवकांच्या बांधनीसाठी केलेल्या प्रयत्नामध्ये कधी यश तर कधी अपयश आलं’.
‘मागील काळात मी नागपूर जिल्हा परिषद सदस्य असताना विकासावर भर देत अनेक मोठे विकास कामे आणि प्रकल्प सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन आपल्या परिसरासाठी आणलं. यात आपण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी आणि नेत्यांनी भरपूर सहकार्य केले याचा मला अभिमान आहे. परंतु काही महिन्यापासून माझे आरोग्य योग्य नसल्यामुळे काही दिवस (६ महीने) मी कार्यरत राहु शकत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. कृपया माझा राजीनामा स्वीकारावा, ही विनंती, कृपया माझा राजीनामा स्विकारावा, हि विनंती,
आपला नम्र
(सलिल देशमुख) असे ते म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




