नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकांच्या (Bihar Assembly Elections) तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, १४ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी हि निवडणूक होत असून, ६ आणि ११ नोव्हेंबरला बिहारमध्ये मतदान होणार आहे.
यावेळी कुमार म्हणाले कि, बिहारमध्ये आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्याचसोबत सर्व निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदानाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदारांना नावे नोंदवता येतील. एसआयआरच्या माध्यमातून अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. याशिवाय निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असेही कुमार यांनी म्हटले.
बिहारमध्ये एकूण मतदार किती?
बिहारमध्ये एकूण ७ कोटी ४२ लाख मतदार आहेत. त्यापैकी ३ कोटी ९२ लाख पुरुष आणि ३ कोटी ५० लाख महिला मतदार आहेत. तर १४ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर १, २०० मतदार असतील.




