Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशबिहारमध्ये पुन्हा एनडीए,नितीशकुमार होणार चौथ्यांदा मुख्यमंत्री

बिहारमध्ये पुन्हा एनडीए,नितीशकुमार होणार चौथ्यांदा मुख्यमंत्री

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

बिहारमध्ये अखेर रात्री उशीरा चित्र स्पष्ट झालं असून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने 125 जागांवर विजय मिळवला आहे. तर तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला 110 जागा जिंकण्यात यश आलं. बिहारमध्ये इतरांच्या खात्यात 8 जागा पडल्या.

नितीश कुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. दरम्यान, भाजपाला मागे टाकून राजदने मुसंडी मारल्याचे चित्र होते. त्यांनी 59 जागा पटकावल्या आहेत तर 17 जागांवर त्यांनी आघाडी होती. त्यामुळे हा आकडा 76 झाला होता. तर भाजपाचा आकडा 73 होता. या राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला.

दरम्यान, ही मतमोजणी सुरू असतानाच राष्ट्रीय जनता दलाने एक गंभीर आरोप केला. कमी फरकाने निवडून येणार्‍या जागांबाबत प्रशासनावर दबाव टाकण्यात येत आहे, असं आरजेडीकडून सांगण्यात येत आहे. त्यावर आता निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या मतदारसंघात दोन उमेदवारांमधील फरक कमी आहे, तिथं पुन्हा मतमोजणी शक्य आहे, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता बिहारमधील काही जागांवर पुन्हा मतमोजणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

.

यापैकी 45 जागांवर राजद, आठ जागांवर काँग्रेस आणि डाव्यांनी 12 जागांवर विजय मिळवला आहे. महाआघाडीने 48 जागांवर आघाडी घेतली आहे. एमआयएमला 3 जागांवर, बसपाला एका जागेवर तर अपक्षांना एका जागेवर विजय मिळाला आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.

तत्पूर्वी मंगळवारी सकाळी कल येऊ लागले, तेव्हा बिहारच्या खुर्चीची शर्यत आणखी रंजक बनली. अगदी सुरुवातीपासूनच महाआघाडी आघाडीवर होती. सकाळी 9 वाजेपर्यंत इतकी आघाडी घेतली होती की, त्यांचे सरकार बनेल असे वाटत होते. मात्र एका तासानंतर संपूर्ण चित्र पालटले आणि नितीश कुमार यांनी बाजी पलटली. एनडीए 120 च्या जवळ पोहोचताना दिसली. पुढील अर्ध्या तासात एनडीएने बहुमताचा आकडा पार केला होता. त्यानंतर आलेल्या निकालात दोन्ही पक्षात चुरस पहावयास मिळाली.

एमआयएमची बाजी

बिहारच्या अमौर आणि कौचाधामनसह तीन मतदारसंघांमध्ये एमआयएमचे उमेदवार जिंकले आहेत. अमौर मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार अख्तरुल इमान यांना तब्बल 85 हजार 391 मतं मिळाली आहेत. तर कौचाधामन मतदारसंघात मोहम्मद इजहर अस्फी यांना 79 हजार 548 मतं मिळाली आहे. एमआयएम पक्षाने 20 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत.

मोठा भाऊ झाला लहान..

या निकालांच्या परिणामांमुळे आत्तापर्यंत असलेला मोठा भाऊ म्हणजेच नितीशकुमार आता लहान भाऊ झाले आहेत. दोन्ही पक्षांचे राजकारणातील स्थान आणि मान यावर या निकालांचा परिणाम होणार आहे. या निकालांपर्यंत मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या जेडीयूला लहान भावाच्या भूमिकेत एडजस्ट व्हावे लागणार आहे.

‘तेजस्वी’ची मेहनत प्रेरणादायी

बिहारमध्ये तरुण नेतृत्व उदयाला येत आहे. पण तिथे अपेक्षेनुसार निकाल लागले नाहीत. बिहारमध्ये भाजप विरुद्ध एकटे तेजस्वी यादव अशीच निवडणूक पाहायला मिळाली. तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध पंतप्रधान, केंद्रातील अनेक मंत्री, स्थानिक राजकीय पक्ष आणि प्रशासनाची ताकद होती, अशा परिस्थितीतही तेजस्वी यादव यांनी चांगली लढत दिली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

फडणवीसांचा डंका !

सध्या एनडीए आघाडीवर असल्याचे चित्र आहे. यातच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला. असे बिहार भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय टायगर यांनी म्हटले आहे. असे म्हणत, बिहार मधील या यशाचे श्रेय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या