Wednesday, October 9, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १९ सप्टेंबर २०२४ - साक्षर करून सोडावे सकलजन

संपादकीय : १९ सप्टेंबर २०२४ – साक्षर करून सोडावे सकलजन

शिक्षणाचे महत्व समाजाच्या लक्षात आणून देण्यासाठी महाराष्ट्रातील संतांनी आणि समाजसुधारकांनी आजन्म कष्ट उपसले. ती मंडळी शिक्षणाचे चालतेबोलते विद्यापीठच होती. त्यांनी समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न केला . निरक्षरतेचे तोटे समजावून सांगितले. जागरूकतेला कोणत्याही सीमांचे बंधन नसते.

शैक्षणिक जागरूकतेचा तोच वारसा झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील 200 गावांमधील विद्यार्थी पुढे चालवत आहेत. या गावांमध्ये 600 ठिकाणी रोज प्रौढ साक्षरता वर्ग भरतात. जे मोठ्या इयत्तेमधील विद्यार्थी चालवतात. शिकणार्‍या नागरिकांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) साक्षरतेचे प्रमाणपत्र देते. 2022 साली मुलांनी शिक्षकांच्या प्रेरणेने ही मोहीम सुरू केल्याचे यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांत म्हटले आहे.

- Advertisement -

मुलांचा उपक्रम नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल. शिक्षणामुळे माणसाच्या बुद्धीचा, तर्कशक्तीचा, वैचारिक क्षमतेचा विकास होतो. त्याआधारे घटनांकडे बघण्याची आणि समतोल निर्णय घेण्याची शक्यता वाढू शकेल. ज्याची समाजाला कधी नव्हे ती इतकी गरज आहे. अंधश्रद्धांचेच उदाहरण घेतले जाऊ शकेल. अंधश्रद्धेचा शाप राज्यातीत आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात अंधश्रद्धांचा विळखा पडल्याचे वृत्त अधूनमधून प्रसिद्ध होते. जादूटोण्याच्या संशयावरून पाच व्यक्तींची हत्या करण्याची घटना नुकतीच उघडकीस आली.

छत्तीसगडच्या एका जिल्ह्यात ती घडली. महाराष्ट्रातही अशा घटना अधूनमधून घडतात. त्यासह अनेक मुद्यांवरून समाजात भेदाभेद आढळतात. माणसांमध्ये वैरभाव निर्माण होतांना आढळतो. माणसांना मानवधर्माचा विसर पडत चालला असावा अशी शंका यावी असे वातावरण माणसे अनुभवतात.

एक प्रकारची सामाजिक अस्वस्थता माणसे अलीकडच्या काळात सातत्याने अनुभवतात. अशा परिस्थितीत शिक्षणाचा श्रीगणेशा माणसांना योग्य वर्तणुकीचे भान देऊ शकेल. तर-तम माणसांना कळू शकेल. सेवाभावी वृत्ती वाढू शकेल. माणूस बनण्याची गरज सार्वत्रिक आढळते. ते भान शिक्षण देऊ शकेल. पालकांना असे भान आले तर त्याचा फायदा त्यांच्याच मुलांना म्हणजेच पर्यायाने विद्यार्थ्यांना होऊ शकेल. जीवन जगण्याची कलाही कदाचित ते शिकू शकतील. त्याची सुरुवात लातेहार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यावरून प्रेरणा घेऊन असे विविध प्रकारचे उपक्रम इतरत्रही चालवले जाऊ शकतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या