अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या दुचाकी चोरी प्रकरणाचा छडा लावत तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने एकास ताब्यात घेत एकूण 9 लाख 50 हजार रूपये किंमतीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
शुभम ज्ञानेश्वर कोडम (रा. इस्कॉन मंदिराजवळ, सावेडी) यांच्या गॅरेजमधून अज्ञात इसमाने दोन महागड्या दुचाकी चोरी केल्या. या प्रकरणी कोडम यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचत अनिकेत बाबासाहेब कर्जुले (वय 23, रा. मोकाशे वस्ती, वाणीनगर, अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून 6 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद कोकरे सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर, अंमलदार बाळासाहेब गिरी, योगेश चव्हाण, दीपक गांगर्डे, सुजय हिवाळे, कपील गायकवाड, बाळासाहेब भापसे, सतीष भवर, सतीष त्रिभुवन, महेश पाखरे, दीपक शिंदे, रवी टकले, बापूसाहेब म्हस्के, प्रमोद लहारे यांच्या पथकाने केली.




