अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बायो मेेडिकल वेस्टचा कचरा उघड्यावर टाकल्याने सावेडीच्या पाईपलाईन रस्त्यावरील श्रीराम चौकात असलेल्या रेडियंट लाईफ रुग्णालयास महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. रुग्णालयाने बायो मेडिकल वेस्ट रस्त्यावर फेकल्याने रुग्णालयाच्या या निष्काळजीपणाची बाब येथील महावीर पोखरणा यांनी महापालिकेचे सावेडीचे स्वच्छता निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी या रुग्णालयावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
यासंदर्भात पोखरणा यांनी सांगितले की, रुग्णालयात रोज निर्माण होणार्या बायोमेडिकल वेस्टची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र, या नियमाला शहरातील काही रुग्णालये केराची टोपली दाखवत असून उघड्यावर सर्रास जैविक कचरा फेकला जात आहे. परिणामी संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. शहरातील रूग्णालयातून बायोमेडिकल वेस्टचा कचरा रोज मोठ्या प्रमाणात निघत असून घातक असा हा कचरा काही रुग्णालयांकडून उघड्यावर टाकला जात आहे.
वास्तविक महापालिकेने बायोमेडिकल वेस्टसाठी खासगी मक्तेदाराला ठेका दिला आहे व त्या ठेकेदाराकडून नियमितपणे रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टचा कचरा संकलितही केला जातो. मात्र, असे असतानाही काही रुग्णालये असा कचरा रस्त्यावर फेकत आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व रुग्णालयांतील बायो मेडिकल वेस्ट कचर्याच्या विल्हेवाटीची तपासणी करण्याची मागणीही पोखरणा यांनी केली आहे.