Friday, May 3, 2024
Homeनाशिकपक्षी गणनेत ३० हजार पक्ष्यांची नोंद; अतिवृष्टीमुळे परदेशी पक्ष्यांचे आगमन लांबले

पक्षी गणनेत ३० हजार पक्ष्यांची नोंद; अतिवृष्टीमुळे परदेशी पक्ष्यांचे आगमन लांबले

नाशिक | प्रतिनिधी 

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने, ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभीपासून महाराष्ट्राच्या भरतपूर म्हणजेच, नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात पक्ष्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. नोव्हेंबरमध्ये १८ हजार २८४ पाहुण्यांची, तर डिसेंबर अखेरीस ३० हजार ५०२ पाहुण्यांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात नुकतीच पक्षी गणना करण्यात आली. या प्रगणनेत चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, कोठुेरे, कुरूडगाव, काथरगाव अशा एकूण सहा ठिकाणी पक्षीनिरीक्षण करण्यात आले.

त्यामध्ये २७ हजार ०२१ पाणीपक्षी, तर ३ हजार ४८१ झाडांवरील व गवताळ भागातील पक्षी दिसून आले आहेत. एकूण ३० हजार ५०६ पक्षी अभयारण्यात असले, तरी परदेशी पाहुण्यांची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे.

दरवर्षी डिसेंबर अखेरीस देश-विदेशातील पक्षी नांदूरमध्यमेश्वर येथील पक्षी अभयारण्यात दाखल होतात. मात्र, यंदाच्या अतिवृष्टीमुळे स्थलांतर परिणाम झाला असून खाद्य व पाणवेली वाढल्याने पक्षी घटले आहेत.

गेल्या महिन्यांच्या पक्षी संख्येत तिप्पटीने वाढ झाली असली, तरी हव्या तितक्या स्वरूपात पक्ष्यांचे दर्शन होत नसल्याने पर्यटकांचाही हिरमोड होत आहे.

मार्च महिन्यापर्यंत देशी-विदेशी पक्षी अभयारण्यात येत असल्याने, डिसेंबर किंवा जानेवारी संख्या वाढण्याचा अंदाज असल्याचे वनपरिमंडळ अधिकारी अशोक काळे यांनी सांगितले.

अभयारण्यात होणारी पर्यटक व अभ्यासकांची गर्दी पाहता विशेष खबरदारी घेण्यात आली असून, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, वनपरिमंडळ अधिकारी अशोक काळे, वनरक्षक अश्विनी काळे, चंद्रमणी तांबे, वन कर्मचारी डॉ. डी. फापाळे, गंगाधर जाधव, सुनिल जाधव, प्रमोद मोगल, एकनाथ साळवे, संजीव गायकवाड यांसह इतरजण पक्ष्यांची माहिती देण्यासह संवर्धनाचे प्रबोधन करत आहेत.-

या पक्ष्यांचे दर्शन

रेड क्रेस्टेड पोचार्ड, ऑस्पेर, वारकरी, गढवाल, फ्लेमिंगो, कॉमन पोचार्ड, विजन, लिलट क्रेक, बेलन्स क्रेक, स्पूनबिल, रिव्हर टर्न, नकटा बदक, टफ्टेड पोचार्ड, प्रॅटिन्कोल, कमळपक्षी, शेकाट्या, कॉमन क्रेन’ यासह जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, ब्राह्मणी बदक यासह इतर प्रजातींचे पक्षी अभयारण्यात दिसून आले असून, जानेवारीमध्ये परदेशी पक्ष्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या