नाशिक । प्रतिनिधी Nashik
पक्ष्यांनी आम्हाला मजगणेफ शिकवले. आज आम्ही त्यांचे मजगणेफ जोपासत आहोत. संवर्धन आणि संगोपन करण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडत आहोत. पक्ष्यांमुळेच आम्हाला लोक पक्षी मार्गदर्शक म्हणून ओळखतात.
आम्हाला आमचे काम आवडते. सुरुवातीला मानधन मिळत नव्हते तरी आम्ही पक्षी मार्गदर्शकाचे काम करतच होतो, अशा भावना नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य येथे पक्षी मार्गदर्शक (गाईड) असलेले अमोल दराडे यांनी व्यक्त केल्या.
अमोल दराडे 12 वर्षांपासून अभयारण्यात गाईड म्हणून काम करतात. ते याच परिसरातील चापडगावचे आहेत. त्यांचे आणि पक्षांचे मैत्र कधी जमले याविषयी सांगताना ते म्हणाले, सुरुवातीला आम्हाला काहीच माहित नव्हते. नेहमीचे पक्षी सोडले तर कोणताच पक्षी ओळखू येत नव्हता. पण माझा एक सहकारी गंगाधर आघाव हा आधीपासूनच हे काम करायचा. त्याच्याबरोबर मी यायला लागलो आणि पक्षी, त्यांच्या सवयी, त्यांचे येण्याजाण्याचे मार्ग मला ओळखू यायला लागले. राज्यात कितीतरी पाणथळ जागा आहेत. पण पक्षी जास्त संख्येने इथेच का येतात याची माहिती मला होऊ लागली.
मी पण अभ्यास करू लागलो. पक्ष्यांचे जग मला समजायला लागले. बोरा सर, दिगंबर गाडगीळ, गोगटे सर यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळते. विश्वरूप राहा सरही सतत मार्गदर्शन करायचे. इंटरनेटचाही आम्हाला फायदा झाला. नंदुरमाध्यमेश्वरचे महत्व लक्षात आले. इथे पाणथळ जागा आहे. शेती आहे. ऊस आहे. भाजीपाला आहे. धरणात 30 ते 40 प्रकारचे मासे आहेत. 100 हुन अधिक प्रकारच्या वनस्पती आहेत. शिवाय धरणाचे तीन भाग पडतात. एक-एकदम डीप वॉटर, दुसरे मिडल, तिसरे मढ वॉटर आणि आजूबाजूला दलदल आहे. त्यामुळे इथे झाडांवरचे, गवतावरचे, पाण्यावरचे, दलदलीतले असे विविध प्रकारचे पक्षी येतात.
हळू हळू मित्र वाढत गेले. सगळे मिळून पक्ष्यांच्या नवीन जागा, नवीन पक्षी शोधायला लागलो. 7-8 वर्षांपूर्वी सर्वानी मिळून स्वखर्चाने एक टेलिस्कोप पण घेतला होता. आता वनखात्याच्या 20-25 दुर्बिणी आणि 2 टेलिस्कोप आहेत. तुम्हाला अलीकडची गंमत सांगतो. एकदा आम्हाला एकदम दुर्मिळ पक्षी दिसला. आम्ही 2-3 दिवस त्याचे निरीक्षण करत होतो. त्याचा आकार खूप मोठा होता. मग सर्वानी त्याचे वर्णन दिले. फोटो टाकले. मग शोध लागला व्हाईट टेल ईगल हा पक्षी आहे. त्या पक्षाने एक महिन्यात लाखाच्या वर महसूल मिळवून दिला होता. या पक्षाची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री या संस्थेत आमच्या नावासह नोंद झाली आहे. हे काम करत असतांना खूप पक्ष्यांना जीवदान दिले आहे.
आम्ही इथे आत्त्ता गंगाधर आघाव, अमोल डोंगरे, शँकर लोखंडे, रोशन पोटे, पंकज चव्हाण, प्रमोद दराडे असे 7-8 गाईड आहेत. इको डेव्हलमेंट कमिटीच्या माध्यमातून आमचे काम चालते. त्या माध्यमातून सर्व गाईडना बाराही महिने रोजगार मिळतो. ही समिती 4-5 वर्षांपूर्वी स्थापन झाली. समिती स्थापन होण्यासाठी वनखात्याचे तत्कालीन अधिकारी एस. व्ही. रामाराव यांनी विशेष परिश्रम घेतले होते. आमचा दिवस पहाटे 5 वाजता सुरु होतो. पहाटे 4-5 वाजेपासूनच पर्यटक यायला सुरुवात होते. दिवस सायंकाळी 7 वाजता मावळतो. वनखाते आम्ही इको डेव्हलपमेंट समिती पर्यटकांना पक्षी दर्शन व्हावे आणि त्यांना समाधान मिळावे म्हणून सतत प्रयत्न करत असतो.