नवी दिल्ली | New Delhi
राज्यसभेच्या १२ जागांसाठी (Rajyasabha Election) १६ ऑक्टोबर २०२६ रोजी निवडणूक पार पडणार आहे. यात उत्तर प्रदेशातील १०, उत्तराखंडमधील १ आणि पश्चिम बंगालमधील एका जागेच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आज (रविवारी) आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या उमेदवारी वेळी भाजपने धक्कातंत्राचा वापर केल्याचे बघायला मिळाले आहे.
भाजपने उत्तराखंडमधून दिनेश आर्य (Dinesh Arya) यांना उमेदवारी दिली आहे. तर पश्चिम बंगालमधून अभिनेत्री रुक्मिणी मल्लिक (Rukmini Mallik) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दिनेश आर्य यांनी यापूर्वी भाजपचे नैनीताल जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले असून, त्यांना उत्तराखंडमध्ये राज्यमंत्र्यांचा दर्जा प्राप्त आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र आता राज्यसभेची उमेदवारी घोषित करत पक्षाने त्यांचे पुनर्वसन केले आहे.
दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडून (TMC) एप्रिल २०२६ मध्ये राज्यसभेवर निवडून येत शपथ घेतलेल्या रुक्मिणी (कोएल) मल्लिक यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांनी जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता भाजपाने त्यांना आपला उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. (कोएल) मल्लिक या अभिनेत्री असून, त्यांनी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे.
राज्यसभेत कुणाचे खासदार सर्वाधिक?
राज्यसभेत एकूण २४५ जागा असून,सध्या २४२ जागा भरलेल्या असून, तीन जागा रिक्त आहेत. राज्यसभेत भाजपचे सर्वाधिक ११७ खासदार असून, मित्र पक्षांचे ११ सदस्य आहेत. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३०, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे ९, द्रविड मुन्नेत्र कळघम ८, समाजवादी पक्ष ४, वायएसआर काँग्रेस पक्ष ४, जनता दल (युनायटेड) ४, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) ४, तेलुगु देशम पक्ष ४, अखिल भारतीय अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) ४, आम आदमी पार्टी ३, भारत राष्ट्र समिती ३, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) ३ आणि राष्ट्रवादी जनता दल व इतर क्षेत्रीय पक्ष व नामनिर्देशित व अपक्ष सदस्य मिळून उर्वरित संख्या आहे.




