घोटी । जाकीर शेख Ghoti
इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुमारे ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.२० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आडवण येथील ७० वर्षीय महिला घोटी परिसरातून जात असताना MH.15 KP 9794 क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना लक्ष्य केले. यातील एका संशयिताने चौकडीचा शर्ट परिधान केला होता. त्याचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचे तक्रारीत नमूद आहे. चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची मनीमंगळसूत्राची पोत (७ ग्रॅम) आणि सोन्याचे झुबे (५ ग्रॅम) असा एकूण ३७ हजार रुपये किमतीचा ऐवज हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.
दिवसा महामार्गावर वृद्ध महिलेला लक्ष्य करून दागिने हिसकावण्याच्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्ग आणि परिसरातील रस्त्यांवर पोलिसांनी गस्त वाढवावी, तसेच संशयितांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




