नाशिक । प्रतिनिधी Nashik
लहानपणापासून भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने जिद्दीने वाटचाल करणाऱ्या नाशिकच्या मंथन युवराज पतकी याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) एनडीए-२, २०२६ परीक्षेत देशपातळीवर २८१ वे मानांकन मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मंथन याने अगदी बालपणापासूनच भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित केले होते. केवळ स्वप्न पाहून न थांबता ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्याने लहान वयापासूनच नियोजनबद्ध अभ्यास, शारीरिक तंदुरुस्ती आणि कठोर परिश्रमांवर भर दिला. या ध्येयपूर्तीच्या प्रवासात त्याने छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्रातील नामांकित शासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेत (एसपीआय) प्रवेश मिळविला. या संस्थेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी कठीण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत महाराष्ट्रातून निवड झालेल्या मोजक्या ६० विद्यार्थ्यांमध्ये त्याने स्थान मिळविले. त्याच्या यशस्वी वाटचालीतील ही पहिली महत्त्वपूर्ण पायरी ठरली.
संस्थेतील शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण अभ्यास, शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी घेतलेली मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर मंथन याने एनडीए-२, २०२६ परीक्षेत देशात २८१ वे मानांकन मिळविले. त्याच्या या यशाने लहानपणापासून पाहिलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने त्याने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
मंथनच्या या यशामागे त्याचे आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे. त्याची आई माणिक पतकी या नाशिक येथे एसआयडी विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत, तर वडील युवराज पतकी हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. आई-वडिलांकडून मिळालेले शिस्त, कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि देशसेवेचे संस्कार मंथनच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण ठरले.
आई-वडिलांच्या मार्गदर्शनासह स्वतःच्या मेहनतीच्या बळावर मिळविलेल्या या यशामुळे मंथनने नाशिकमधील युवकांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. सैन्याधिकारी होण्याच्या त्याच्या स्वप्नपूर्तीच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.




