मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मार्केटिंगमध्ये भाजप नेत्यांचा हात कोणी धरणार नाही. इथून मुक्त झाल्यावर भाजप नेते एमबीए कॉलेजमध्ये मार्केटिंग शिकवायला जाऊ शकतात, अशी टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावरील विरोधकांच्या टीकेला विधानसभेत उत्तर देताना, उत्सव केला की लोकांपर्यंत पोहोचता येते. मार्केटिंग होते, असे विधान केले होते. आज विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या नियम २९३ च्या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा हवाला देत सरकारवर उपरोधिक शब्दात टीका केली.
सध्या सत्ताधाऱ्यांना डोनाल्ड ट्रम्प यांची भुरळ पडली आहे. त्यांनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवले , भारत-अमेरिका करार झाला, अशा घोषणा केल्या जातात. पण त्या करारातील अटी काय आहेत? आता आपल्या शेतकऱ्यांना अमेरिकेशी स्पर्धा करावी लागणार आहे, असे पाटील म्हणाले. आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करायचे नाही, असे ट्रम्प म्हणत असताना अमेरिकेबाबत एकही भाजप नेता किंवा मंत्री त्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी पाटील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेचा दाखला देत देवयानी खोब्रागडे प्रकरणात अमेरिकेला ठणकावून जाब विचारण्यात आल्याची आठवण करून दिली.
पुणे आयटी हब असला तरी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. शक्तीपीठ मार्गासारख्या प्रकल्पांपेक्षा शहरांच्या वाहतूक समस्यांवर भर द्यावा, अशी सूचना पाटील यांनी केली. लॉकडाऊननंतर ३५-४० कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्याचा दावाही त्यांनी केला. समृद्धी महामार्गालगत १८ इंडस्ट्रियल टाऊनशिप उभारण्याच्या निर्णयाची आठवण करून देत पाटील यांनी जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधील प्रस्तावित टप्प्यांची सद्यस्थिती जाहीर करण्याची मागणी केली. तसेच हा महामार्ग सुरू झाल्यापासून ४ हजार ७६२ अपघात आणि ३१४ मृत्यू झाले आहेत. हा आर्थिक कॉरिडॉर म्हणत उद्घाटन झाले, मात्र त्यातून अपेक्षित समृद्धी दिसत नाही, अशी टीका पाटील यांनी केली.
मुंबईतील मेट्रो प्रकल्पांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एमएमआरडीएच्या कामकाजावर टीका करत जयंत पाटील यांनी मेट्रो स्लॅब कोसळण्याच्या घटनेचा उल्लेख केला. या घटनेआधी एक्स पोस्ट करत एका तक्रारदाराने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु या तक्रारीकडे दुर्लक्ष करत ही पोस्ट खोटी असल्याचे सांगण्यात आले आणि काही दिवसांतच अपघात झाला, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. तसेच सर्व मेट्रो मार्गांचे सखोल ऑडिट करावे, दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही त्यांनी केली.





