ग्लास्गो येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान स्कॉटलंडने काही महत्त्वाचे आणि लोकप्रिय खेळ वगळण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याचा फटका सर्वच सहभागी देशांना बसणार असला, तरी सर्वाधिक नुकसान भारताचे होणार आहे. यजमानांनी ज्या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंची पदक मिळवण्याची खात्री किंवा हमखास आशा असायची, तेच खेळ बाद केले आहेत. त्यामुळे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा खर्या अर्थाने कस लागणार आहे. या निर्णयाचा भारताच्या पदक मिळवण्याच्या संधींवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. मागील म्हणजेच बर्मिंगहॅम (२०२२) राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १६ खेळांमध्ये २१० खेळाडूंचे मोठे पथक पाठवले होते आणि तब्बल ६१ पदके जिंकून देदीप्यमान व ऐतिहासिक कामगिरी केली होती. परंतु या ६१ पदकांपैकी तब्बल ३० पदके अशा खेळांमधून आली होती, जे यावेळेस यजमानांनी स्पर्धेतून थेट वगळले आहेत.
यात बॅडमिंटन (६ पदके), क्रिकेट (१ पदक), हॉकी (२ पदके), स्क्वॉश (२ पदके), टेबल टेनिस (७ पदके) आणि कुस्ती (१२ पदके) यांसारख्या खेळांचा समावेश आहे. म्हणजेच, भारताची एकूण ५० टक्के पदके ही या वगळलेल्या खेळांतून आली होती. याशिवाय २०२२ च्या स्पर्धेत भारताला सर्वाधिक पदके मिळवून देणारे नेमबाजी आणि तिरंदाजी हे खेळ आधीच्याच आवृत्तीत समाविष्ट नव्हते. आता तर आणखी सहा महत्त्वाचे खेळ वगळल्यामुळे भारताच्या खात्रीशीर पदकांच्या संख्येत कमालीची घट होणे अपरिहार्य मानले जात आहे. या निर्णयामुळे भारतीय क्रीडा रसिकांवर निराशेचे सावट पसरले असले, तरी हे आव्हान म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. यंदा ज्या दहा खेळांचा समावेश करण्यात आला आहे, त्या खेळांमधील भारताची भूतकाळातील कामगिरी संमिश्र राहिली आहे. बॉसिंग (७ पदके), ज्यूदो (३ पदके) आणि वेटलिफ्टिंग (१० पदके) यामध्ये भारताची कामगिरी भूतकाळात समाधानकारक असली, तरी अलीकडच्या काळात त्यात घसरण झाल्याचे स्पष्ट पाहायला मिळाले आहे.
विशेषतः, ऑलिम्पिकमध्ये (२०२४) मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन आणि निखात जरीन यांसारख्या अव्वल खेळाडूंची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न राहिल्याने क्रीडा जगतात मोठी चिंता व्यक्त केली जात होती. तसेच यजमान देशाने सर्व खेळाडूंच्या राहण्याची सोय करण्यासाठी क्रीडा ग्रामची निर्मिती न करता स्वतंत्र व्यवस्था केली आहे, ज्याचा खेळाडूंच्या मानसिक लय आणि दैनंदिन दिनक्रमावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. एकाच छताखाली राहून मिळणारा सांघिक पाठिंबा आणि वातावरण यंदा खेळाडूंना मिळणार नाही. परिस्थिती आव्हानात्मक आणि प्रतिकूल असली, तरी भारतीय खेळाडू नेहमीच संकटांवर मात करत नव्या ताकदीने पुढे येण्यासाठी ओळखले जातात. अशा कठीण काळातही भारताच्या पदकांच्या आशा काही महत्त्वाच्या क्रीडा प्रकारांवर टिकून राहतील. स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा हा नेहमीप्रमाणे सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर असेल. त्याच्यासोबत लांब उडीत मुरली श्रीशंकर, लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंग आणि उंच उडीत सर्वेश कुशारे यांच्याकडून देशाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
अनुभवी मीराबाई चानू, बिंद्याराणी देवी, ज्ञानेश्वरी यादव आणि हरजिंदर कौर यांच्या भक्कम खांद्यावर वेटलिफ्टिंगमध्ये पदके मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असेल. बॉसिंगमध्ये लोव्हलिना बोरगोहेन, जॅस्मिन लंबोरिया आणि सचिन शिवच यांच्या जोरदार पंचवर भारताच्या नजरा खिळलेल्या राहतील. बर्मिंगहॅम स्पर्धेत लॉन बॉल्समध्ये भारताने ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले होते, त्यामुळे यावेळेस या क्रीडा प्रकारात त्याच सर्वोत्तम कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. नवीन खेळ, बदललेली मैदाने, पायाभूत सुविधांचा अभाव आणि ५० टक्क्यांहून अधिक पदक दावेदार खेळांचे वगळणे ही भारतासाठी नक्कीच एक अतिशय कठीण परीक्षा आहे. परंतु खरी खेळाडूवृत्ती, जिद्द आणि चिकाटी ही अशाच संकटसमयी सिद्ध होत असते.
भारतीय खेळाडूंनी यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची संख्या कदाचित कमी दिसेल; परंतु उरलेल्या खेळात मिळवलेले प्रत्येक पदक हे अधिक मोलाचे आणि संघर्षाचे प्रतीक असेल. या कठीण परीक्षेत भारतीय खेळाडू आपल्या कठोर परिश्रमाच्या, तंत्राच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर निश्चितच यशस्वी होतील, असा १४० कोटी देशवासीयांना पूर्ण विश्वास आहे. क्रीडाविश्वातील या कठीण कसोटीत उतरणार्या सर्व भारतीय खेळाडूंना देशवासीयांकडून मनःपूर्वक शुभेच्छा!




