Tuesday, June 16, 2026
HomeराजकीयChhatrapati Sambhajinagar : तिकीट कापल्याने छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक; मंत्र्यांच्या गाड्यांना...

Chhatrapati Sambhajinagar : तिकीट कापल्याने छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक; मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेदरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलहाने हिंसक वळण घेतले आहे. शहरातील भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट राज्याचे मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्यावर हल्लाबोल करत संताप व्यक्त केला.

- Advertisement -

गेल्या २५ वर्षांपासून पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांनी आपल्या मर्जीतल्या लोकांना आणि नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या असंतोषामुळे कार्यालयात केवळ गोंधळच झाला नाही, तर कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवून जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, काही कार्यकर्त्यांनी नेत्यांना उद्देशून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आपला हंबरडा फोडला.

या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला. पक्षाचे जुने कार्यकर्ते प्रशांत भदाणे पाटील यांनी थेट मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्या गाड्या अडवल्या. यावेळी त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. “मी सर्वेक्षणामध्ये आघाडीवर होतो, पक्षासाठी अनेक वर्षे झटलो, पण साहेबांनी त्यांच्या पीएला तिकीट देऊन माझा घात केला,” असा गंभीर आरोप भदाणे पाटील यांनी केला. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

नाराज कार्यकर्त्यांनी केवळ गोंधळच घातला नाही, तर थेट जातीपातीचे आणि घराणेशाहीचे आरोपही केले. खासदार भागवत कराड यांनी जातीवर आधारित आणि मंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या पीएला व नातेवाईकांना तिकीट वाटप केल्याचा दावा संतप्त कार्यकर्त्यांनी केला आहे. दोन महिला उमेदवारांनी तर थेट अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून ‘जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार नाही’ असा पवित्रा घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या या उग्र रूपामुळे मंत्री सावे आणि कराड यांना शेवटी पोलीस संरक्षणात कार्यालयातून बाहेर पडावे लागले.

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष मानला जातो, मात्र संभाजीनगरमधील या प्रकारामुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. “आम्ही १८ वर्षे पक्षाचे काम केले, १९ गुन्हे अंगावर घेतले, पण ऐनवेळी आम्हाला अंधारात ठेवून बाहेरच्यांना किंवा जवळच्यांना संधी दिली गेली,” अशी भावना सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत हा वाद शांत होतो की बंडखोरी कायम राहते, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...