मुंबई । Mumbai
शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांनी फोडाफोडीच्या राजकरणाला सुरुवात केल्याचे म्हणत अमित शाह यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.
त्यानंतर शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांना प्रत्युत्तर देताना गृहमंत्री यांनी माहिती घेऊन भाषण करायला हवं असं म्हटलं. यावेळी शरद पवार यांनी तडीपार असाही उल्लेख केला होता. त्यावरुनच आता भाजप नेते विनोद तावडे यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे.
दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत, अशी टीका विनोद तावडे यांनी केली आहे.
तसेच, दोन जन्मठेपांची – काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? असा सवाल विनोद तावडेंनी केला आहे. श्रद्धेय अटल जी, अडवाणी जी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे. असाही विनोद तावडे म्हणाले.