नाशिक । प्रतिनिधी Nashik
वाजपेयींच्या काळातील भाजप वेगळी होती आणि आजची भाजप एकाच व्यक्तीची ‘मन की बात’ ऐकत आहे, जनतेच्या मन की नाही असा खोचक टोला शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला.
नवीन नाशकात आयोजीत शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते.यावेळी ठाकरे यांनी बोलतांना पुढील 48 तास आपल्या सर्वांना सतर्क राहावे लागेल. निवडणूक आयोगाने भाजपच्या लोकांकडे लक्ष ठेवावे अन्यथा नाशिककर त्यांच्यावर लक्ष ठेवतील असा सज्जड दम दिला. ते म्हणाले की भाजप सरकार 400 काय 200 जागांचे लक्ष गाठेल का? हा प्रश्न आहे. भाजपला आपल्या देशात हुकूमशाही आणायची असल्याने व संविधान बदलायचे असल्याने त्यांना 400 पार जागा हव्या आहेत. दक्षिण भारतात जनतेने भाजपला नाकारले आहे.
आता संपूर्ण देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. उत्तर प्रदेशात भाजप पन्नास पार जात नाही. भाजपने काश्मीरमधून 370 कलम काढल्याचा आम्हाला देखील आनंद आहे. मात्र काश्मीरमध्ये दोन जागांवर भाजपला उमेदवारच मिळाला नसल्याने त्या जागा लढवत नसल्याची त्यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. भाजपला मतदान करून आपल्याला काय मिळाले हे सर्व मतदारांनी ओळखायला हवे. आपले उद्योग गुजरातला भाजप सरकार पळवून नेत आहे. महाराष्ट्रातील तरुणांना मिळणार्या हजारो नोकर्या आता गुजरातमध्ये गेल्या आहेत, हे सरकार ठराविक नेत्यांसाठी चाललंय हे संपूर्ण जनता बघतच आहे.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारने पहिल्याच अडीच वर्षात शेतकर्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज मुक्ती दिली करोना काळातही कोट्यवधी रुपयांची मदत केली. त्या अडीच वर्षाची कारकीर्द बघा आणि आता या अडीच वर्षाची कारकीर्द बघा आपल्याला फरक नक्कीच समजून येईल. 2019 मध्ये आपले नाशिक त्यांनी दत्तक घेतले होते आणि त्याच नाशिकच्या शेतकर्यांना दोन दिवसापूर्वी झालेल्या मोदींच्या सभेत अटक करण्यात आली. कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना नोटिसा देण्यात आल्या तर काहींना तडीपारची नोटीस काढण्यात आली ही हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल आहे.
आज या सभेत महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने असे निदर्शनास येते की जिथे महिला आहेत तिथे विश्वास आहे व जिथे विश्वास आहे तिथे आपला विजय पक्का आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.