अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात वाढत्या वाहतूक शिस्तभंगाच्या घटना रोखण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अहिल्यानगर शहर पोलिसांनी चारचाकी वाहनांवर असलेल्या काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) हटवण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी (28 जानेवारी) सायंकाळी पोलिसांनी ठिकठिकाणी केलेल्या नाकाबंदीदरम्यान 90 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, बुधवारी सायंकाळी देखील शहर पोलिसांनी नाकाबंदी करून कारवाई सुरू केली होती. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
अहिल्यानगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या आदेशानुसार, मंगळवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कायनेटिक चौक, प्रोफेसर चौक आणि भिंगार नाला याठिकाणी नाकाबंदी करून तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान काळ्या काचा वापरणार्या वाहनचालकांवर तात्काळ कारवाई करत त्यांच्या वाहनांवरील ब्लॅक फिल्म जागच्या जागी काढण्यात आल्या. कोतवाली पोलिसांनी 36 वाहने, तोफखाना पोलिसांनी 27 वाहने, भिंगार कॅम्प पोलिसांनी 12 वाहने तर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी 15 वाहनांवर कारवाई केली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तोफखान्याचे निरीक्षक आनंद कोकरे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदारांनी ही कारवाई केली.
कठोर कारवाईचा इशारा
शहरातील वाहतूक शिस्त राखण्यासाठी काळ्या काचा लावून नियमभंग करणार्या वाहनचालकांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिला आहे.