नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ (ICC Women’s T20 World Cup 2026) मध्ये रविवारी (दि.१४) क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि पारंपरिक लढत पाहायला मिळणार आहे. बर्मिंगहॅमच्या ऐतिहासिक एजबेस्टन स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानचे (India and Pakistan) महिला संघ आमनेसामने येत असून, दोन्ही संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात या हाय-व्होल्टेज सामन्याने करतील. कागदावर आणि आकडेवारीचा विचार केला तर भारतीय संघाचे पारडे जड आहे.
दोन्ही संघांमधील (Two Team) आजवरच्या १६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांपैकी १३ सामन्यांत भारताने बाजी मारली आहे. मात्र, अशा सामन्यांमध्ये केवळ आकडेवारी महत्त्वाची नसून मैदानावर दडपण कोण चांगल्या प्रकारे हाताळते, यावर विजय अवलंबून असतो. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात समतोल आणि खोली आहे. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा डावाची आक्रमक सुरुवात करतील, तर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि ऋचा घोष यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. भारताची खरी ताकद त्यांची फिरकी गोलंदाजी आहे, ज्यामध्ये दीप्ती शर्मा, राधा यादव आणि श्री चरणी पाकिस्तानच्या धावसंख्येला ब्रेक लावू शकतात.
दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ इतिहास (History) बदलण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्यांच्या कामगिरीत सातत्य नसले तरी कर्णधार फातिमा सना आपल्या अष्टपैलू खेळाने सामन्याचे चित्र पालटू शकते. सलामीवीर मुनीबा अलीवर डावाला आकार देण्याची जबाबदारी असेल, तर सादिया इक्बाल आणि नशरा संधू यांच्या फिरकीवर भारताच्या तगड्या फलंदाजीला रोखण्याचे आव्हान असेल. एजबेस्टनची खेळपट्टी पाहता १५० ते १६५ धावांचे आव्हान आव्हानात्मक ठरू शकते. इतिहासाची बाजू भारताकडे (India) असली, तरी या कट्टर पारंपरिक लढतीमधील भावनिक तीव्रता आणि दबावाचे क्षण सामन्याचा निकाल ठरवतील.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग ११
भारतीय संघ
स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, भारती फुलमाली, श्रेयंका पाटील, क्रांती गौड, रेणुका सिंग.
पाकिस्तान संघ
मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, आयेशा जफर, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), इरम जावेद, नतालिया परवेझ, तुबा हसन, डायना बेग, नशरा संधू, सादिया इक्बाल




