मुंबई | Mumbai
बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक संपन्न झाली. तब्बल ४० वर्षांनंतर रितू तावडे यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबई नगरीत बसणार आहे. उपमहापौर म्हणून शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड करण्यात आली. मात्र, सत्तारोहणाच्या या पहिल्याच दिवशी भाजप आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपच्या नगरसेवकांनी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर महायुतीचे सर्व नगरसेवक मुंबईत महानगरपालिकेत आले. पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक आल्यानंतर जोरदार शंखनाद करण्यात आला. भाजपच्या महापौरांच्या निवडीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांच्या प्रचंड उत्साह संचारला होता. मात्र त्यांच्यासमोरच सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबई महापौर आणि उपमहापौरांच्या सत्तारोहणाचा कार्यक्रम आज सकाळी ११ वाजता पार पडला. महापौरपदासाठी रितू तावडे तर उपमहपौरपदासाठी संजय घाडी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषित करण्यात आली. महायुतीच्या सदस्यांनी यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला तसेच महायुतीच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. परंतु निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असताना दोन्ही बाजूकडील सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
निवडणुकीची प्रक्रिया सुरू करताच शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर आक्षेप नोंदवला. महापालिकेत तब्बल सातवेळा निवडून आलेल्या श्रद्धा जाधव यांच्यावर जबाबदारी देण्याऐवजी प्रशासनाने परंपरा मोडीत काढण्याला पसंती दिल्याचे म्हणत शासनावर आरोप केले. यावेळी ठाकरे सेनेच्या नगरेसेवकांनी निषेध निषेध म्हणत पेडणेकरांना साथ दिली.
यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी जय श्रीराम आणि मोदी-मोदीच्या घोषणा देऊन पालिका सभागृह डोक्यावर घेतले. भाजपच्या नगरसेवकांकडून मोदी-मोदीचा जयघोष थांबतच नव्हता. तेव्हा समोर उभ्या असलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपच्या ‘मोदी-मोदी’ पाठोपाठ अचानक ‘चोर है, चोर है’, अशा घोषणा सुरु केल्या. ठाकरे गटाच्या या अनपेक्षित पवित्र्यामुळे भाजप नगरसेवकांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा थांबवल्या.
मात्र, लगेचच भाजपच्या नगरसेवकांनी ‘देवाभाऊ-देवाभाऊ’ नावाचा गजर सुरु केला. त्यावर कोणीही ‘चोर है, चोर है’ कोणीही म्हंटले नाही. मात्र, ठाकरे गटाच्या नगरसेवकांनीही ‘ठाकरे-ठाकरे’ नावाचा जयघोष सुरु केला. या घोषणांमुळे पालिकेचे सभागृह दणाणून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांच्यासमोरच हा प्रकार घडला. दोघांनीही सभागृहाच्या गॅलरीत बसून हा प्रकार शांतपणे बघत होते. पहिल्याच दिवशी ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने आल्याने आगामी काळातही या दोन पक्षांमध्ये अशाचप्रकारची खडाजंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




