नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला. येथे एक बोलेरो वाहनाचे नियंत्रण सुटल्याने कालव्यात पडली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला, तर एक जण बेपत्ता आहे. तर, तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांपैकी नऊ जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे.स्थानिक लोकांनी काच फोडून ४ जणांना वाचवले. हे सर्व जण पृथ्वीनाथ मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी जात होते. त्याचवेळी हा भीषण अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, इटियाथोकच्या बेलवा बहुता कालव्याच्या पुलावर हा अपघात झाला. बोलेरोमधील सर्व लोक पृथ्वीनाथ मंदिरात जलाभिषेकासाठी जात होते. हे लोक मोतीगंज पोलिस स्टेशन परिसरातील सिहागावचे रहिवासी होते. गाडीत १५ लोक होते. या अपघातात पाण्यात बुडून ११ जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण बेपत्ता आहे. तर ४ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
कालव्याजवळचा रस्ता निसरडा आणि खूपच अरुंद होता, त्यात बोलेरो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कालव्यात उलटली. गाडी पूर्णपणे पाण्यात बुडाली. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. गाडी पाण्यात बुडाल्याने गाडीचे सर्व दरवाजे बंद झाल्याने प्रवाशांना बाहेर पडताच आले नाही. त्यामुळे प्रवाशांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.
स्थानिक लोकांनी सांगितले की सकाळी ६ वाजताच्या सुमारास मोठा आवाज ऐकू आला. काही वेळातच लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना बोलेरो कालव्यात पडल्याचे दिसले. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि स्वतःहून बचावकार्य सुरू केले. नंतर प्रशासन आणि एनडीआरएफ टीमने मदत सुरु केली.
योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त
अपघाताची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलदगतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





