जळगाव | प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयातील शौचालयात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर बुधवारी भाजपतर्फे रुग्णालयात निषेध आंदोलन झाले. जमावबंदी व साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, डॉ.राधेश्याम चौधरी यांच्यासह २२ जणांविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.
भुसावळ येथील बेपत्ता कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह पाच दिवसांनंतर रुग्णालयातील वॉर्ड क्र.७ मध्ये बुधवारी सकाळी आढळला. या घटनेमुळे राजकीय पदाधिकार्यांनी संताप व्यक्त केला. भाजपच्या पदाधिकार्यांनी बुधवारी दुपारी रुग्णालयात निषेध आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्त्व आमदार राजूमामा भोळे व महापौर भारती सोनवणे आणि नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केले. पदाधिकारी अधिष्ठाता भास्कर खैरे यांच्या दालनात पोहचले. त्यांनी रुग्णालयातील परिस्थितीबाबत खैरै यांना निवेदन दिले. त्यानंतर काही पदाधिकार्यांनी घोषणबाजी केली.
याबाबत सरकारतर्फे सहायक फौजदार भटू नेरकर यांनी फिर्याद दिली. त्यावरुन आमदार राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, स्थायी समितीच्या सभापती ॲड.शुचिता हाडा, भाजप गटनेते भगत बालाणी, अरविंद देशमुख, मनोज आहुजा, माजी नगरसेवक अतुल हाडा, नगरसेवक सुनील खडके, पिंताबर भावसार यांच्यासह अन्य ८ ते १० जणांविरुध्द जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, भादंवि कलम १८८, १४३,२६९ अन्वये तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब व साथीचेरोग प्रतिबंधक कायदा कलम २,३ व ४ व ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.




