आपत्कालीन परिस्थितीत कार्यालयात होते गैरहजर
नंदुरबार | प्रतिनिधी
संचारबंदी व लॉकडाऊन कालावधीत कार्यालय प्रमुखांना १०० टक्के कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत निर्देश देऊनही गैरहजर राहिल्याबद्दल जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त आर.एम.कोल्हे यांना निलंबीत करून त्याची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
त्यानुसार कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता उपआयुक्त सु.द.सैंदाणे यांनी श्री.कोल्हे यांना तात्काळ खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे. श्री.कोल्हे गैरहजर राहिल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत जिल्ह्यात करण्यात येणार्या उपाययोजनांबाबत त्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करता आली नाही.
या कालावधीत जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील तलाठी भरतीसाठी जिल्हा निवड समितीची बैठक घेण्यात आली असता श्री.कोल्हे गैरहजर असल्याने तलाठी पदाची निवड यादी प्रसिद्ध करण्यास विलंब झाला आहे. त्यांच्या गैरहजेरीमुळे त्यांच्या कार्यालयाचे कामकाजही असमाधानकारक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी उपआयुक्तांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या उपाययोजना न राबविल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.श्री.कोल्हे हे २५ मार्च पासून गैरहजर असून यापूर्वी त्यांना ज्ञापनाद्वारेदेखील त्यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारणा करण्यात आली आहे.




