अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
ग्राहक फिरवल्याच्या गैरसमजातून होम लोनचे काम करणार्या तरूणाला सावेडी उपनगरातील जॉगिंग ट्रॅक परिसरात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात बिल्डरसह तिघांविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
आरीफ बनेमियाँ शेख (वय 25, रा. नांदगाव शिंगवे, ता. अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार विनोद खेडकर (रा. आंबेडकर चौक, विवेकानंद अपार्टमेंट, बोल्हेगाव), एका मोबाईल क्रमांकधारक व्यक्तीसह अन्य एका अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि संशयित एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संशयित विनोद खेडकर हा बिल्डर असून तक्रारदार शेख हे होम लोनचे काम करतात. शनिवारी (14 नोव्हेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास सावेडी येथील जॉगिंग ट्रॅकवर शेख यांनी आपला ग्राहक फिरवल्याचा संशयिताला गैरसमज झाला.
या कारणावरून खेडकर व त्याच्या साथीदारांनी शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शनिवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत.




