अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तपोवन रस्ता परिसरातील शिवाजीनगर येथे राहत्या घरात प्रवेश करून सुमारे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने व 9 हजार 500 रूपयांची रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी एका महिलेसह अन्य चार अनोळखी व्यक्तींविरूध्द न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी (23 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन बाबासाहेब दहिफळे (वय 40, रा. थ्री डी कॉर्नर, शिवाजीनगर, तपोवन रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. स्वाती बाबासाहेब सोनवणे (रा. लेखानगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी) या महिलेसह चार अनोळखीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च 2024 रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी सचिन दहिफळे व त्यांची आई भाजी खरेदीसाठी तपोवन रस्त्यावरील भाजी मार्केटमध्ये गेले होते. त्यावेळी स्वाती सोनवणे हिने अन्य चार अनोळखी व्यक्तींसोबत संगनमत करून दहिफळे यांच्या घरासमोरील कुंडीत ठेवलेली चावी घेत घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे. घरात प्रवेश केल्यानंतर संशयित आरोपींनी बेडरूममधील कपाट उघडून त्यातील सामानाची उचकापाचक केली. कपाटात ठेवलेले 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यामध्ये बोरमाळ, मंगळसूत्र, अंगठी, डोरले व कानातील दागिन्यांचा समावेश होता, तसेच नऊ हजार 500 रूपयांची रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सचिन दहिफळे व त्यांची आई घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तपासणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, सचिन दहिफळे हे त्यावेळी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद दाखल करून घेतली नाही. त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तोफखाना पोलिसांनी 23 जून 2026 रोजी फिर्याद दाखल करून घेतली आहे. महिला पोलीस अंमलदार खुडे अधिक तपास करीत आहेत.




